अहमदनगर –पारनेरचे आमदार निलेश लंके यांनी ग्रामपंचायतीची निवडणूक बिनविरोध करणाऱ्या ग्रामपंचायतींना बक्षीस जाहीर केले. त्यास जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी पाठिंबा दिला होता. तसेच या बक्षीस योजनेचे लाभ अनेक गावांनी घेवून ग्रामपंचायत बिनविरोध करावी, असे आवाहन केले होते. मात्र, अण्णाचे गाव असलेल्या राळेगणसिध्दीमधील लोकांनी तब्बल ३५ वर्षांची गावाची परंपरा खंडीत करून ग्रामपंचायत निवडणूक ताकदीने लढविण्याचा निर्धार केला आहे.
राळेगणसिद्धीतील निवडणुकांबद्दल बोलताना अण्णा हजारे म्हणाले, ‘राळेगणसिद्धीमध्ये ३५ वर्षे ग्रामपंचायतीची निवडणूक नव्हती. यावेळी गावातील काही तरुण माझ्याकडे आले. ते म्हणाले, निवडणूक झाली नाही तर आम्हाला लोकशाही कशी कळणार? त्यामुळे आपण लोकांना सांगितले की, त्यांची इच्छा आहे तर होऊ द्या निवडणूक. फक्त भांडणतंटा करायचा नाही. त्यामुळे यावेळी राळेगणसिद्धीमध्ये आम्ही निवडणूक करायचे ठरविले आहे.
बरेचसे कार्यकर्ते केवळ निवडणुकीची इच्छा ठेवतात मात्र, करत काहीच नाहीत. अनेक जण निवडणुकीत उभे राहिले तर निवडूनही येत नाहीत. मात्र, त्यांची इच्छा आहे, आणि आपण लोकशाही स्वीकारली आहे तर यांना नको कसे म्हणार? म्हणून निवडणूक होत आहे. पूर्वी एका निवडणुकीत आम्ही सर्व महिला उभ्या केल्या होत्या. त्यांच्याविरुद्ध उभे राहण्याची कोणाची हिंमत झाली नाही. कारण महिलांकडून होणारा पराभव त्यांच्या जिव्हारी लागला असता. त्यामुळे त्यावेळी निवडणूक बिनविरोध झाली,’ असे सांगून यापूर्वी निवडणुका बिनविरोध करण्याच्या पद्धतीचेही त्यांनी उदाहरण दिले.
COMMENTS