गुजरातमध्ये निवडणुकीच्या तोंडावर मोठ्या राजकीय घडामोडी,  भाजपच्या अडचणी वाढल्या !

गुजरातमध्ये निवडणुकीच्या तोंडावर मोठ्या राजकीय घडामोडी, भाजपच्या अडचणी वाढल्या !

गुजरात विधानसभेची निवडणूक एक दोन दिवसात जाहीर होण्याची शक्यता आहे. त्या पार्वभूमीवर राज्यात मोठ्या राजकीय हालचाली सुरू झाल्या आहेत. राज्यातील तीन तगडे युवक नेते काँग्रेसला साथ देणार आहेत. त्यामुळे भाजपच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

शनिवारी रात्री गुजरातमधील ओबीसी, एससी, एसटी मंचचे नेते अल्पेश ठाकोर यांनी काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांची भेट घेतली. यावेळी गुजरात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष भरतसिंह सोळंकी, प्रभारी अशोक गेहलोत आणि ज्येष्ठ नेते अहमद पटेल उपस्थित होते. भेटीनंतर बोलताना ठाकोर यांनी आपण येत्या २३ तारखेला काँग्रेसमध्ये प्रवेश करत असल्याचं सांगितलं. २३ तारखेला अल्पेश यांनी ओबीसी, एस, एसटी मंचचा मेळावा आयोजित केला आहे. या मेळाव्याला राहुल गांधी हजेरी लावणार आहेत. त्यावेळीच ठाकोर हे काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत.

अल्पेश ठाकोर यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार अशी घोषणा करताच पाटीदार नेता हार्दिक पटेल यांनी त्यांना ट्विटरवरुन शुभेच्छा दिल्या. तसंच ठाकोर यांनी हार्दिक हे काँग्रेसमध्ये प्रवेश करणार नसले तरी काँग्रेसला साथ देणार असल्याची माहिती दिली. तसंच गुजरातमधील आणखी एक युवक नेते जिग्नेश मेवानी यांनीही आपण काँग्रेसमध्ये प्रवेश न करता काँग्रेसच्या साथीनं भाजपच्या विरोधात लढणार असल्याचं स्पष्ट केलं आहे.

हे तीन नेते काँग्रेससोबत आल्यानं भाजपच्या अडचणी वाढल्या आहेत. कारण या तीनही युवक नेत्यांना विविध जाती घटकांचा मोठा पाठिंबा आहे. गुजरातमध्ये जवळपास २० टक्के पाटीदार समाज आहे. त्याचं नेतृत्व हार्दिक पटेल करत आहेत. तर दलितांची संख्याही जवळपास ७ टक्के आहे. जिन्गेश मेवानी यांना मोठ्या प्रमाणात दलित समाजाच्या पाठिंबा आहे. तर अल्पेश ठाकोर हे ओबीसी नेते म्हणून ओळखले जातात. त्यांनाही ओबीसी समाजाचा मोठा पाठिंबा आहे.

ज्येष्ठ नेते शंकरसिंह वाघेला यांनी काही दिवसांपूर्वी काँग्रेसला रामराम केल्यामुळे काँग्रेस काहीशी बॅकफूटवर गेली होती. मात्र या तीन युवक नेत्यांच्या मदतीमुळे पुन्हा काँग्रेसमध्ये जाण आली आहे. आता मोदी, शहांच्या गुजरातमधील भाजपचं तगडं आव्हान काँग्रेस या नेत्यांच्या मदतीने मोडून काढते का ते पहावं लागेल. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीची सेमीफायनल म्हणून या निवडणुकीकडं पाहिलं जातंय.

COMMENTS