अहमदाबाद – सिनेमातीलही एखाद्या प्रसंगाला लाजवेल असा एक प्रकार काल गुजरातमध्ये घडला. हार्दिक पटेल यांच्या पाटीदार अनामत आंदोलन समितीचे स्थानिक संयोजक नरेंद्र पाटील यांनी रविवारी संध्याकाळी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. त्यानंतर रविवारीच रात्री उशीरा त्यांनी पत्रकार परिषद घेतली. त्या पत्रकार परिषदेत त्यांनी भाजपवर गंभीर आरोप केले. भाजपनं आपल्याला फोडण्यासाठी 1 कोटी रुपयांची ऑफर दिली होती. त्यापैकी 10 लाख रुपयाचं टोकन आपल्याला दिल्याचा आरोपही पटेल यांनी केला. ते दहा लाख रुपये त्यांनी पत्रकार परिषदेत दाखवले. उरलेले 90 लाख रुपये नंतर देण्याचं आश्वासन भाजपनं दिल्याचंही पटेल यांनी सांगितलं.
या ड्रामॅटिक घडामोडींमुळे गुजरातमधील राजकारणात एकच खळबळ माजली आहे. पटेल यांनी ते आता नेमके कुठे आहेत हेही पत्रकार परिषदेत सांगितलं नाही. पाटीदार नेता हार्दिक पटेल यांनी आगामी विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला मदत करण्याचा निर्णय घेतल्यानंतर भाजपने हार्दिक पटेल यांचे साथीदार गळाला लावण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. शनिवारी हार्दिक यांच्या जवळच्या दोन सहका-यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. नरेंद्र पटेल यांच्या या आरोपामुळे मात्र राज्यातलं राजकारण एकदम गरमागरम झालं आहे.
COMMENTS