आमचे श्रद्धास्थान मातोश्री, तिथून जो आदेश येईल तो आम्हाला मान्य – गुलाबराव पाटील

आमचे श्रद्धास्थान मातोश्री, तिथून जो आदेश येईल तो आम्हाला मान्य – गुलाबराव पाटील

नाशिक – आमचं श्रद्धास्थान मातोश्री आहे. तिथून जो आदेश येतो तो आम्हाला मान्य असतो असं वक्तव्य शिवसेनेचे नेते गुलाबराव पाटील यांनी केलं आहे.  मंत्रिमंडळात कोणत्या पदावर स्थान मिळणार याबाबत पत्रकारांनी प्रश्न केला असता पाटील यांनी हे उत्तर दिलं आहे.  तसेच यावेळे त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही खोचक टोला लगावला आहे. मंत्रिमंडळ विस्तारात तुमचा समावेश होईल का? असा प्रश्न केला असता मुख्यमंत्री ब्राह्मण आहेत पंचांग पाहून मंत्रिमंडळाचा विस्तार करतील असे खोचक उत्तर त्यांनी दिले आहे. राहू कोण, केतू कोण? हे त्यांच्या लक्षात येईल असंही त्यांनी म्हटले आहे. नाशिकमध्ये पत्रकारांशी बोलत असताना त्यांनी हे उत्तर दिलं आहे.

दरम्यान पेट्रोलचे दर १०० रुपये प्रति लिटर होण्याची वाट बघत असून सरकारने लोकांची मानसिकताच अशी करून टाकली असल्याची टीका त्यांनी केली आहे. तसेच पेट्रोलचे दरच नाही बदलले तर पंपावर असलेले पोस्टरही बदलले. पूर्वी एक म्हातारीबाई होती आता तिथे एक मॉडेल आली आहे. त्यामुळे आगामी काळात पेट्रोल डिझेलचे भाव वाढणार आहेतच असेही पाटील यांनी म्हटले आहे.

 

COMMENTS