फेरीवाल्यांना हाकलणा-या मनसे कार्यकर्ते आणि नेत्यांना अटक

फेरीवाल्यांना हाकलणा-या मनसे कार्यकर्ते आणि नेत्यांना अटक

मनसे उपविभाग अध्यक्ष अखिल चित्रे यांच्या सह काही पदाधिकारी-कार्यकर्त्यांना वाकोला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तर ठाण्यातही मनसे पाच ते सहा कार्यकर्त्यासह मनसे शहर अध्यक्ष अविनाश जाधव यांना नौपाडा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. कल्याणमध्ये प्रदेश उपाध्यक्ष काका मांडले, जिल्हाध्यक्ष उल्हास भोईर, शहराध्यक्ष कौस्तुभ देसाई, डोंबिवलीचे मनसे शहराध्यक्ष मनोज घरत, केडीएमसीतील मनसे गटनेते प्रकाश भोईर यांनाही अटक करण्यात आली आहे.

एलफिन्स्टन रेल्वे दुर्घटनेनंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी चर्चगेट येथे काढलेल्या आंदोलनावेळी फेरीवाल्यांविरोधात कारवाई करण्याची मागणी केली होती. रेल्वेने कारवाई केली नाही तर आम्ही करू, असा इशारा त्यांनी दिला होता. फेरीवाल्यांविरोधात कारवाईसाठी रेल्वे प्रशासनाला 15 दिवसांची मुदत दिली होती. मुदत संपल्यानंतर मनसे कार्यकर्ते आक्रमक झाले असून. त्यांनी ठाणे, कल्याण, डोंबिवली स्थानकांबाहेरील फेरीवाल्यांविरोधात आंदोलन केले.

ठाणे, डोंबिवली आणि कल्याण येथील मनसेच्या कार्यकर्त्यांनी फेरीवाल्यांना हुसकावून लावले. याप्रकरणी कल्याण-डोंबिवलीत फेरीवाल्यांविरोधात केलेल्या आंदोलनाप्रकरणी कल्याणमधील महात्मा फुले चौक आणि डोंबिवलीतील रामनगर पोलीस ठाण्यात मनसे कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते. त्यानंतर आज पोलिसांनी मनसेचे प्रदेश उपाध्यक्ष काका मांडले, जिल्हाध्यक्ष उल्हास भोईर, शहराध्यक्ष कौस्तुभ देसाई, डोंबिवलीचे मनसे शहराध्यक्ष मनोज घरत, कल्याण-डोंबिवली महापालिकेतील मनसेचे गटनेते प्रकाश भोईर यांच्यासह पदाधिकाऱ्यांना अटक केली आहे.

COMMENTS