औरंगाबाद – शिवसेनेचे औरंगाबादमधील माजी आमदार प्रदीप जयस्वाल यांना अटक करण्यात आली आहे. औरंगाबादेतील हिंसाचारातील आरोपी सोडण्याच्या मागणीवरून प्रदीप जयस्वाल यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस स्टेशनमध्ये घुसून मारहाण केल्याप्रकरणी त्यांना अटक करण्यात आली आहे. शहरातील क्रांती चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रदीप जयस्वाल यांनी क्रांती चौक पोलीस ठाण्यात रात्री 11 ते 12 च्या दरम्यान गोंधळ घातला होता. त्यानंतर पोलिसांनी त्यांना अटक केली आहे.
दरम्यान प्रदीप जयस्वाल यांनी पोलीसांना शिवीगाळ केल्याचा आरोप करण्यात आला असून त्यांनी पोलीस ठाण्यातील ठाणे अमलदाराच्या टेबलवरील काच फोडली आणि खुर्च्यांची फेकाफेक केल्याचाही त्यांचावर आरोप आहे. त्यामुळे जयस्वाल यांच्या विरोधात शासकीय कामात अडथळा आणणे, शिवीगाळ करणे, ऑफिसची तोडफोड करणे या कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.
दरम्यान औरंगाबाद हिंसाचार प्रकरणात क्रांती चौक पोलीसांनी गांधीनगर भागातील दोन जणांना ताब्यात घेतलं होतं. त्यावेळी प्रदीप जयस्वाल यांनी ताब्यात घेतलेल्या दोघांची जामिनावर सुटका करण्याची मागणी केली. व त्यानंतर गोंधळ घातला असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. याप्रकरणी प्रदीप जयस्वाल यांनी सर्व आरोप फोटाळले आहेत.
COMMENTS