हैदराबाद – हैदराबादमध्ये महिला डॉक्टरवर बलात्कार करुन तिची हत्या करणाऱ्या चारही आरोपींचं एन्काऊंटर करण्यात आलं आहे. घटनास्थळी नेत असताना चौघांचं एन्काऊंटर करण्यात आलं . या एन्काऊंटरमध्ये चारही आरोपी ठार झाले आहेत. घटनास्थळावर नेल्यानंतर आरोपींनी पोलिसांकडची शस्त्र हिसकावून हल्ला करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी गोळीबार केला, असं स्पष्टीकरण हैदराबाद पोलिसांनी दिलं आहे. या चकमकीवर विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. पीडितेला न्याय देण्यासाठी वापरलेली पद्धत अयोग्य असल्याची खंत उज्ज्वल निकम यांनी प्रसारमाध्यमांशी बोलून दाखवली. झटपट न्याय देण्याच्या प्रकारामुळे कायद्याचं राज्य धोक्यात येईल अशीही भीती त्यांनी व्यक्त केली.
दरम्यान हैदराबादमध्ये 27 नोव्हेंबरला 4 आरोपींनी पहिले पीडित महिलेची गाडी पंक्चर केली आणि मदत करण्याचं नाटक केलं. यानंतर चारही आरोपी तिला टोल प्लाझाजवळच्या निर्जन स्थळी घेऊन गेले. याठिकाणी महिलेवर अत्याचार करुन तिची हत्या करण्यात आली. डॉक्टर महिलेवर अत्याचार केल्यानंतर पेट्रोल पंपावरून पेट्रोल विकत घेऊन तिला हैदराबाद-बंगळुरू नॅशनल हायवेवर तिला जाळण्यात आलं. चारही आरोपींना 29 नोव्हेंबरला अटक करण्यात आली. त्यानंतर आज आरोपींचा एन्काऊंटर करण्यात आलं आहे.
‘निर्भया’च्या आईनं पोलिसांना केला सलाम
‘सिंघम स्टाईल’ कारवाईचं सोशल मीडियावरून भरभरून कौतुक होतंय. पीडितेला न्याय मिळाल्याची भावना व्यक्त होतेय. या पार्श्वभूमीवर, आपली मुलगी अशाच भीषण घटनेत गमावलेल्या, दिल्लीतील ‘निर्भया’च्या आईनंही पोलिसांना सलाम केला आहे आणि आपल्या मुलीच्या मारेकऱ्यांना तातडीने फाशी देण्याची विनंती केली आहे.
हैदराबादमध्ये जे झालं त्याने मी खूप खूश आहे. पोलिसांनी खूप चांगलं काम केलंय, त्यांना मी धन्यवाद देऊ इच्छिते. त्यांच्यावर कुठलीही कारवाई होता कामा नये. उलट त्यांनी एक उदाहरण घालून दिलं आहे. अशा कारवायांची आज गरज आहे, अशा शब्दांत ‘निर्भया’ची आई आशा देवी यांनी एन्काउंटर करणाऱ्या पोलिसांची पाठराखण केली आहे.
COMMENTS