…त्यावेळी इंदिरा गांधी नाकावर रुमाल धरून आल्या होत्या; मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल

…त्यावेळी इंदिरा गांधी नाकावर रुमाल धरून आल्या होत्या; मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल

मोरबी – गुजरात विधानसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. भाजप आणि काँग्रेस नेते एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडत आहेत.  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मोरबी येथील प्रचारसभेत माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या गुजरात दौऱ्याची आठवण करून देत काँग्रेसवर तोफ डागली आहे. ‘इंदिराजींनी मोरबी दौऱ्यावेळी नाकाला रुमाल लावला होता. मात्र, जनसंघ, आरएसएस आणि भाजपच्या लोकांना मोरबीच्या रस्त्यांमधून माणुसकीचा सुगंध येतो, असे ते म्हणाले.

सौराष्ट्राच्या दौऱ्यावर असलेल्या मोदींनी मोरबी येथील सभेत इंदिरा गांधी यांच्या दौऱ्याची आठवण करून देत काँग्रेस आणि राहुल गांधींवर निशाणा साधला आहे. ‘काँग्रेसच्या नेत्यांना गुजरातमध्ये फिरताना दुर्गंधी येते. पण भाजप नेत्यांना गुजरातच्या मातीतून सुगंध येतो’, असे ते म्हणाले.

मोरबीच्या लोकांच्या सुख दुःखात सहभागी होण्यासाठी मी नेहमीच येतो. सत्तेत असो अथवा नसो, आम्ही लोकांच्या पाठिशी ठामपणे उभे राहतो आणि समाजाची सेवा करतो, असेही मोदी म्हणाले. सौराष्ट्र आणि कच्छमधील लोकांना कायमच पाण्याचा प्रश्न भेडसावतो. पुरेसे पाणी नसल्याने त्यांच्या दैनंदिन जीवनावर परिणाम होत असल्याचे लक्षात आल्यानंतर भाजपने ही परिस्थिती बदलली. नर्मदेचे पाणी या परिसरात पोहोचवले. आम्ही संकटाचे संधीत रुपांतर करून विकास साधतो, असे म्हणत त्यांनी काँग्रेसला लक्ष्य केले.

COMMENTS