क्रिकेट – बॉलिवूड आणि पॉलिटिक्स यांच्यात खूप जवळचं नातं आहे. यांच्याबद्दल सर्वसामान्यांना खूप क्रेज असते. तसे त्यांच्यातले संबंधही अत्यंत जवळचे असतात. राजकारणातलं मोठं घराणं गांधी आणि सिनेमातलं मोठं घराणं कपूर. यांचेही अत्यंत जवळचे संबंध होते. भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु आणि पृथ्वीराज कपूर यांचे अत्यंत जवळचे संबंध होते. त्यांना एकमेकांबद्दल मोठा आदर होता.
त्यानंतर इंदिरा गांधी आणि कपूर घराण्याचे अत्यंत जिव्हाळ्याचे संबंध होते. त्यातूनच इंदिरा गांधी यांना त्यांचा मोठा मुलगा म्हणजेच माजी पंतप्रधान राजीव गांधी यांना कपूर घराण्यातली मुलगी सून म्हणून हवी होती. स्वर्गीय राज कपूर यांची कन्या ऋता यांचं राजीव गांधीशी लग्न व्हावं अशी त्यांची इच्छा होती. मात्र ती पूर्ण होऊ शकली नाही. रशीद किडवई यांनी लिहिलेल्या ‘नेता अभिनेता, बॉलिवूड स्टार पॉवर इन इंडियन पॉलिटिक्स’ या पुस्तकात अनेक खुलासे केले गेले आहेत. त्यापैकी हा एक आहे.
कपूर घराण्यातील मुलगी सून करण्याची इंदिरा गांधी यांची इच्छा पूर्ण होऊ शकली नाही. राजीव गांधी शिकण्यासाठी इंग्लडला गेले आणि तिथे ते सोनिया यांच्या प्रेमात पडले. आणि 1968 मध्ये सोनिया आणि राजीव गांधी यांचं लग्न झालं. गांधी आणि कपूर घराण्याचे संबंध त्यानंतरच्या पुढच्या पिढीतही चांगले राहिले. मात्र त्याचं नात्यात रुपांतर होऊ शकलं नाही.
बॉलिवूडची अभिनेत्री करिना कपूर हिचं नावही अनेक अभिनेत्यांशी जोडलं गेलं. कधी शाहीद कपूर तर कधी इतर अभिनेते. शेवटी तिनं पतोडी घराण्यातला नबाव सैफ अली खान याच्याशी लग्न केलं. मात्र तिच्या करिअरच्या पहिल्या टप्प्यात तिनं एका मुलाखतीमध्ये तुला कुणाशी डेट करायला आवडेल असं विचारलं होतं. त्यावर तिनं सध्याचे काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांचं नाव घेतलं होतं. अर्थात नंतर तिनं आपल्याला तसं म्हणायचं नव्हतं असं सांगत त्याचा इन्कारही केला होता.
COMMENTS