नागपूर – जैतापूरमध्ये मोबदला मिळाल्याने प्रकल्प होऊ शकतो, असे शिवसेनेकडून सांगितले जात आहे. त्यांच्या भूमिकेत झालेला हा बदल पाहून आनंद वाटतो, मात्र, हा मोबदला कोणाला मिळाला, हे पाहावे लागेल, असे म्हणत विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेला टोला लगावला आहे. ते नागपूरमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी मॅग्नेटिक महाराष्ट्र परिषदेत उद्योजकांशी संवाद साधला होता. यावेळी मोबादला मिळाल्याने जैतापूर प्रकल्प होऊ शकतो, असे स्पष्ट केले. यावर देवेंद्र फडणवीस यांनी नाणारसंदर्भातही शिवसेनेने अशीच भूमिका घ्यावी. तेथील लोकांनी या प्रकल्पासाठी जमीनही दिलेली आहे, याकडे फडणवीस यांनी लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.
तसेच उद्धव ठाकरे यांनी एक मिश्कील टिप्पणी केली होती. अनेक उद्योजक मला उद्घाटनासाठी निमंत्रण देत असतात. त्यांना मी इतकेच सांगतो की, तुम्ही मला 2050 मध्येही मुख्यमंत्री म्हणून उद्घाटनाला बोलावलंत तरी मी येईन, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले होते.
यावर फडणवीस यांनी मुख्यमंत्री आशावादी आहे याचा आनंद आहे. त्यांना 50 वर्ष मुख्यमंत्री राहण्यासाठी शुभेच्छा, असे फडणवीस यांनी म्हटले. तसेच संजय राऊत यांच्यावर मी एक शब्दही बोलणार नाही, असेही सांगितले.
COMMENTS