जळगाव – महापालिका निवडणुकीच्या तोंडावर जळगामध्ये एका पक्षातून दुस-या पक्षात उड्या मारण्याचा प्रकार जोरदारपणे सुरू आहे. परवा राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहराध्यक्षांनी शिवसेनेत प्रवेश केला. तर काही आजी माजी नगरसेवकांनी भाजपात प्रवेश केला होता. काल महापौर ललित कोल्हे यांनी सहा नगरसेवकांसह भाजपमध्ये प्रवेश केला आहे. आठच दिवसांपूर्वी कोल्हे यांनी मनसेतून खान्देश विकास आघाडीत प्रवेश केला होता. पण काल रात्री पुन्हा भाजपात प्रवेश केला. जलसंपदा मंत्री गिरीष महाजन आणि पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या उपस्थितीमध्ये हा प्रवेश सोहळा झाला. या प्रवेशामुळे आता भाजप आणि खान्देश विकास आघाडीच्या संभाव्य आघाडीबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे.
निवडणूक जाहीर झाल्यानंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस वगळता सर्वांनी खान्देश विकास आघाडीच्या बॅनरखाली निवडणूक लढवण्याचा निर्णय जवळापास निश्चित केला होता. मात्र सुरेश जैन यांच्यासोबत जाण्यासाठी ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी विरोध केला. तसचं स्थानिक आमदार सुरेश भोळे यांनीही जैन यांच्यासोबत जाण्यास विरोध केला. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खडसे आणि भोळे यांनी जैन यांच्यासोबत जाण्यास विरोध केल्याची चर्चा आहे. मात्र आता भाजप स्वतंत्रपणे निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता आहे. मात्र कोल्हे यांच्या प्रवेशाबाबत खडसे आणि भोळे यांना विश्वासात घेतले की नाही याबाबत साशंकता आहे. तसंच प्रवेशाच्यावेळी ललित कोल्हे यांना कोणतं आश्वासन दिलं याबाबतही उलटसुलट चर्चा सुरू आहे.
काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या आघाडीबाबत अजून ठोस निर्णय काहीच झालेला नाही. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. आघाडी होणार की नाही, झाली तर आपल्याल तिकीट मिळणार का याबाबत कार्यकर्ते अस्वस्थ झाले आहेत. गेल्यावेळी खान्देश विकास आघाडी आणि मनसे आणि राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेमध्ये एकत्र होते. आता भाजपच्या नव्या पवित्र्यामुळे कशी समिकरणे पुढे येतात ते पहावे लागेल.
COMMENTS