जानकर-फडणवीसांचे भांडण

जानकर-फडणवीसांचे भांडण

पुणे – भाजपचा घटक पक्ष असलेल्या राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी पवार यांची भेट घेतल्यापासून जानकर युतीतून बाहेर पडणार असल्याची चर्चा सुरू होती. दरम्यान बारामतीत माध्यमांशी बोलताना जानकरांनी फडणवीसांसोबत भांडण असल्याचं सांगत राजकीय गौप्यस्फोट केला आहे.

महादेव जानकर आज एका कार्यक्रमासाठी बारामतीत होते. त्यावेळी त्यांना माध्यमांशी संवाद साधला. “माझं आणि देवेंद्र फडणवीसांचं भांडण सुरु आहे. पण त्याचा फायदा आम्ही दुसऱ्याला होऊ देणार नाही. त्यामुळे आपण एनडीएमध्येच राहणार आहे,” असं जानकर म्हणाले.

रासपाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची अलिकडेच भेट घेतली होती. त्या भेटीवरून राजकीय वर्तुळात जानकर भाजपाची साथ सोडणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं. पण या चर्चांना त्यांनी स्वतः फेटाळून लावल्या होत्या.“भाजपावर आपण नाराज असलो, तरी कुठेही जाणार नाही. आपण सध्या एनडीएमध्येच आहोत आणि पुढेही एनडीएमध्येच राहणार. एखाद्या पक्षाचा पडता काळ असल्यावर आपण पळून जायचं नसतं,” असं जानकर म्हणाले.

COMMENTS