मुंबई पदवीधर मतदारसंघाचे उमेदवार राजेंद्र कोरडे यांचा विजय निश्चित- जयंत पाटील

मुंबई पदवीधर मतदारसंघाचे उमेदवार राजेंद्र कोरडे यांचा विजय निश्चित- जयंत पाटील

मुंबई – पुरोगामी पदवीधर आघाडीचे मुंबई पदवीधर मतदारसंघाचे उमेदवार राजेंद्र कोरडे यांचा विजय नक्की आहे असा विश्वास शेकापचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांनी पत्रकार परिषदेमध्ये व्यक्त केला. आज मुंबई पदवीधर मतदारसंघातील पुरोगामी पदवीधर आघाडीचे उमेदवार राजेंद्र कोरडे यांच्या उमेदवारीबाबत  शेकाप कार्यालयात पुरोगामी पदवीधर आघाडीची संयुक्त पत्रकार परिषद घेण्यात आली.

मुंबई पदवीधर मतदारसंघाची मक्तेदारी खरी डाव्या विचाराच्याच उमेदवाराची होती. मधु दंडवते यांच्यासारखे दिग्गज नेते या मतदारसंघात निवडून येत होते. जनता पक्षामध्ये सर्व पक्ष विलिन झाल्यानंतर समाजवादी विचारसरणीच्या लोकांनी त्यावेळच्या जनसंघाला ही जागा दिली आणि त्यानंतर काही काळानंतर ती जागा शिवसेनेकडे गेली. परंतु गेल्या दोन वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये सर्व पुरोगामी पक्ष एकत्र येण्याची प्रक्रिया जी मोठयाप्रमाणात सुरु झाली आहे. त्याची सुरुवात बाळाराम पाटलांच्या निवडणूकीने झाली. कोकण शिक्षक मतदारसंघात सर्व पुरोगामी पक्षांनी त्यांना पाठिंबा दिला.आणि विशेषत: टिडीएफसारख्या अनेक विविध शिक्षक संघटनांनी पाठिंबा दिला त्यामुळे बाळाराम पाटलांचा विजय झाला असेही जयंत पाटील म्हणाले.

आत्ताची लढाई उमेदवाराची नाही तर ही तत्वाची लढाई – आमदार हेमंत टकले

आत्ताची लढाई उमेदवाराची नाही तर ही तत्वाची लढाई आहे. या देशात चांगला विचार जर रुजवायचा असेल तर कुठेतरी याला आळा बसला पाहिजे यादृष्टीने आम्हाला ही निवडणूक अतिशय महत्वाची वाटते. म्हणून कुठल्याही परिस्थितीत ही निवडणूक जिंकायचीच अशा निर्धाराने आम्ही एकत्र आलो आहोत आणि आम्ही विजयी होवू असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कोषाध्यक्ष आमदार हेमंत टकले यांनी पत्रकार परिषदेमध्ये व्यक्त केला.

शिवसेनेची मक्तेदारी मोडण्यासाठीच आम्ही एकत्र आलोय –डॉ.राजु वाघमारे

मुंबई पदवीधर मतदारसंघातील ही निवडणूक फक्त शिवसेनेची मक्तेदारी आहे की काय ती मक्तेदारी मोडण्यासाठी आणि त्यांना मुंबईमधून पूर्णपणे घालवण्यासाठी आम्ही एकत्र आल्याची माहिती काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते डॉ.राजु वाघमारे यांनी दिली.
ही विचारांची लढाई आहे. कारण हा वक्त का तगाजा आहे. पदवीधर लोक आहेत. पदवीधरांना जर पकोडे तळायला सांगणार असाल आणि त्यांच्या पदवीचा आणि भविष्याचा अपमान सत्ताधाऱ्यांकडून होत असेल तर त्या सत्ताधाऱ्यांना त्यांची जागा दाखवणं हे आमचं काम आहे. पदवीधरांशी आम्ही बोललो त्या पदवीधरांनी आज सत्ताधारी तरुण मुलांना ज्यांनी पदवी घेतली त्यांना ज्या पध्दतीने वागवले जाते आहे. ज्या उन्मादाने आणि माजाने त्यांना नमवण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांची अवेहलना करत आहेत. त्याच्याविरोधात आवाज उठवावा असं प्रत्येक तरुणाला वाटत आहे. तरुणांच्या भ्रमाचा भोपळा या सत्ताधाऱ्यांनी फोडला आहे. त्यामुळे या सत्ताधाऱ्यांच्या विरोधात या विचारांच्याविरोधात, या तत्वाच्याविरोधात ही लढणारी निवडणूक आहे असेही राजू वाघमारे म्हणाले. राजेंद्र कोरडे हा एक चांगला आणि अभ्यासू उमेदवार मुंबई पदवीधर मतदारसंघात देण्यात आला आहे. त्यामुळे राजेंद्र कोरडे यांचा विजय निश्चित आहे असेही राजु वाघमारे म्हणाले.

या पत्रकार परिषदेला शेकापचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कोषाध्यक्ष आमदार हेमंत टकले, काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते डॉ.राजु वाघमारे, राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ, प्रवक्ते संजय तटकरे, माजी आमदार अशोक धात्रक, सिध्दीविनायक ट्रस्टचे माजी अध्यक्ष नरेंद्र राणे, पुरोगामी पदवीधर आघाडीचे मुंबई पदवीधर मतदारसंघाचे उमेदवार अँड.राजेंद्र कोरडे आदी उपस्थित होते.

COMMENTS