मुंबई – जोपर्यंत कष्टकरी, अन्यायग्रस्त माणूस आहे, तोपर्यंत लाल बावटा आणि विचार संपणार नसल्याचं वक्तव्य शेकापचे नेते जयंत पाटील यांनी केलं आहे. तसेच सरकार मोर्चेक-यांना त्यांच्या मागण्यांसंदर्भात लेखी हमी देत नाही तोपर्यंत मुंबई सोडणार नाही अशी मोर्चेक-यांची भूमिका असल्याचं वक्तव्यही जयंत पाटील यांनी केलं आहे. तसेच या आदिवासी जनतेच्या नावावर शेतजमिनी नाही त्यामुळे त्यांना कार्जमाफी योजनेचा लाभ मिळत नाही त्यामुळे वनकायद्याची प्रभावी अंमलबजावणी व्हावी अशी मागणीही पाटील यांनी केली आहे.
दरम्यान संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनानंतर शेतक-यांचं हे एक ऐतिहासिक आंदोलन असल्याचं वक्तव्य शिवसेनेचे नेते अनिल परब यांनी केलं आहे. खऱ्या अर्थाने सरकारने मोर्चेकर्यांच्या मागण्यांना न्याय द्यावा, अतिशय बिकट परिस्थितीला या जनतेला सामोरं जावं लागतंय, संवेदनशीलतेने, सहानुभूतीपूर्वक या विषयाकडे सरकारने पाहावं असंही परब यांनी म्हटलं आहे.
तसेच या आक्रोशाचं रूपांतर आणखी आक्रमक परिस्थितीत होऊ नये, पुतळा संपला म्हणून लेनिन आणि मार्क्सचे विचार संपलेले नाहीत हे या मोर्चाने दाखवून दिलं असल्याचं आमदार कपिल पाटील यांनी म्हटलं आहे. तसेच या मोर्चाच्यानिमित्ताने सरकारला हा ईशारा असून मुंबईकरांनी या मोर्चाला चांगली साथ दिली असल्याचं वक्तव्य राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी म्हटलं आहे. तर सरकारने कर्जमाफीबाबत निकष टाकले तरी शिवसेना गप्प बसली असल्याचंही तटकरे यांनी म्हटलं आहे.
COMMENTS