मुंबई – मुंबईत पावसाळी अधिवेशन सुरु आहे. या अधिवेशनादरम्यान आज विरोधी पक्षांचा अंतिम आठवडा प्रस्ताव सादर करण्यात आला. यावेळी राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी सरकारवर जोरदार टीका केली. राज्य सरकारनं मंत्रीमंडळात काही जणांना वगळलं. त्यात गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांचा समावेश होता. मेहता यांनी राजीनामा दिला म्हणजे गुन्हा घडला असं नाही. वृत्त छापून आल्यानंतर मेहता यांना राजीनामा द्यावा लागला. या प्रकरणात गुन्हा दाखल केला पाहिजे असं जयंत पाटील यांनी म्हटलं आहे.
तसेच मुंबईतील एसआरएचे प्रकल्प म्हणजे भ्रष्टाचाराचे कुरण झालं असल्याचा आरोप पाटील यांना केला आहे. दर्शन डेव्हलपरनं २०१६-१७ साली भाजपाला साडेसात कोटी रुपये देणगी दिली. मग या कंपनीनं सगळे कायदे नियम धाब्यावर बसवले. या कंपनीला सुरुवातीला तोटा होता. या कंपनीनं साई दर्शन हा एसआरए प्रकल्प राबवला आणि त्यात प्रचंड त्रुटी असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. त्यांनी सरकारी जमीनीवर डीएचएलफकडून २ हजार कोटींचं कर्ज घेतलं. एका प्रकल्पात २ पेक्षा जास्त कंपन्या असू शकत नाहीत,त्यांनी मात्र 4 शेल कंपन्या तयार केल्या. हे सगळं गंभीर आहे. याची चौकशी सरकारने केली पाहिजे असं पाटील यांनी म्हटलं आहे.
तसेच बांधकामाचा खर्च ३०० कोटी, पण सरकारच्या भूखंडावर बिल्डरने २ हजार कोटी रुपये जमा केली. उरलेले १७०० कोटी रुपये कुठे गेले. या कंपनीला भाजपाला देणगी देण्याची सवय आहे, हे पैसे त्याने कुठल्या राजकीय पक्षाला दिले की भाजपाला दिले.
२ हजार कोटी रुपये उचलले पण या प्रकल्पात आतापर्यंत साधा एक खड्डाही खणला नाही
असंही जयंत पाटील यांनी म्हटलं आहे.
दरम्यान मीरा रोड नवघरला सेव्हन इलेव्हन नावाचं हॉटेल आहे, भाजपाचे आमदार नरेंद्र मेहता यांचे बंधू यात भागिदार आहेत. कांदळवनात, ना विकास क्षेत्रात अतिरिक्त चटई क्षेत्र मंजूर करून उच्च न्यायालयाच्या आदेशाचं उल्लंघन केलंय. सरकारने या ठिकाणी हॉटेलला परवानगी दिली, मात्र तिथे क्लब बांधण्यात आले. एक चटईक्षेत्रफळासह सेव्हन इलेव्हन क्लबच्या बांधकामाला बेकायदेशीर परवानगी दिली. मीरा-भाईंदर महापालिकेने परवानगी रद्द केली होती. मात्र सदर जागेवरून राज्य महामार्ग जातोय असं दाखवून नगरविकास विभागाने क्लबला बांधकामाची परवानगी दिली. त्या परवानगीवर मुख्यमंत्र्यांची सही आहे. महामार्गावर तारांकित हॉटेलची परवानगी असते, मात्र इथे क्लबसाठी परवानगी देण्यात आली. कांदळवनात बांधकाम करता येत नाही तरी 700 कोटीचा खाजगी क्लब बांधण्याची परवानगी कशी दिली ? याप्रकरणी अनेकांनी तक्रारी केल्या पण कोणतीही चौकशी झालेली नाही.भाजपाचे आमदार नरेंद्र मेहता यांचे बंधूं यात भागिदार आहेत. सरकारी जागा घेऊन रुग्णालय बांधू या अटीवर नरेंद्र मेहता यांनी जागा घेतली.
मात्र मेहता यांनी गाळे बांधले असा आरोपही पाटील यांनी केला आहे.
COMMENTS