…त्यामुळेच हसन मुश्रीफ यांच्यावर कारवाई -जयंत पाटील

…त्यामुळेच हसन मुश्रीफ यांच्यावर कारवाई -जयंत पाटील

सांगली –  राष्ट्रवादी काँग्रेसचे कोल्हापूर जिल्ह्यातील दिग्गज नेते आणि  आमदार हसन मुश्रीफ यांच्या घरावर आयकर विभागाने आज छापे मारले आहेत. हसन मुश्रीफ यांचे घर आणि साखर कारखाने या ठिकाणी हे छापे मारण्यात आले. तसेच त्यांच्या साडूच्या घरावरही आयकर विभागाने छापा मारला असून पुण्यात त्यांच्या मुलाचे घर आहे त्या ठिकाणीही आयकर विभागाने छापा मारला आहे. आयकर विभागाच्या या कारवाईवर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी टीका केली आहे.

राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांनी भाजपचं निमंत्रण नाकारलं म्हणूनच त्यांच्यावर कारवाया सुरू करण्यात आल्या आहेत. साम-दाम-दंड-भेद वापरायचा आणि विरोधी नेत्यांच्या मागे एजन्सी लावायची असं भाजपचा उद्योग सुरू आहे. विरोधी पक्षाच्या नेत्यांना नामोहरम करण्याचे काम भाजप मार्फत सुरू असल्याची टीका जयंत पाटील यांनी केली आहे. हसन मुश्रीफ यांच्या घरी गोरगरीब गरजू रुग्णांना उपचार मिळण्यासाठी पाठवण्यात आलेली पत्र आणि कागदपत्र मिळाली आहेत. त्यांच्या घरात नोटा मिळाल्या नाहीत. राजकीय द्वेषापोटी विरोधी पक्षातील नेत्यांवर धाडसत्र सुरू असल्याचंही पाटील यांनी म्हटलं आहे.

सचिन अहिर यांच्या निर्णयामुळे दुःख -जयंत पाटील

दरम्यान सचिन अहिर यांना राष्ट्रवादी पक्षाने लहान वयात चांगली संधी दिली होती. आमदार पदापासून त्यांना मंत्रीपद दिलं. शिवाय राष्ट्रवादी पक्ष सांभाळण्याची जबाबदारी सुद्धा त्यांच्यावर सोपविण्यात आली होती. मात्र त्यांनी अचानक पणे पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला. या निर्णयामुळे आम्हाला दुःख झालं आहे. त्यांनी पक्ष सोडायला नको होतं. मात्र त्यांच्या मतदारसंघातील अडचणीमुळे कदाचित त्यांनी असा निर्णय घेतला असावा. त्यांच्या पक्ष शोडल्यामुळे मुंबईत आमच्या पक्षात कोणताही परिणाम होणार नाही. मुंबईतील सर्व जिल्हाध्यक्ष आणि पदाधिकारी हे राष्ट्रवादीमध्ये राहतील. लवकरच आम्ही मुंबईचा नवीन अध्यक्ष नेमू असं जयंत पाटील यांनी म्हटलं आहे.

COMMENTS