मुंबई – आज राष्ट्रवादी काँग्रेसचा 21 वा वर्धापन दिन आहे. या निमित्ताने राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि कॅबिनेट मंत्री जयंत पाटील यांनी सूचक विधान केले आहे. ‘आतापर्यंत राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री झाला नाही. कार्यकर्त्यांची तशी इच्छा आहे, जर अशी अपेक्षा केली नाहीतर पक्ष कसा पुढे जाईल’ प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्यांची तशी भावना असू शकते. प्रत्येक पक्षाची एक अपेक्षा असते, ती कार्यकर्त्यांनी बाळगली नाही तर पक्ष तरी कसा पुढे जाणार असं जयंत पाटील म्हणाले आहे. आज मुंबई येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश कार्यालयात फिजिकल डिस्टन्सिंगच्या नियमाचे काटेकोर पालन करुन प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करून पक्षाचा 21 वा वर्धापन दिन साजरा करण्यात आला. यानंतर ते बोलत होते.
दरम्यान गेल्या 21 वर्षात शरद पवारांच्या नेतृत्वाखाली पक्ष विस्तारला आहे. अनेक संकटांमधून पक्ष तावून सुलाखून निघालेला आहे. शरद पवारांच्या पक्षाला फोडण्याचे, तोडण्याचे, त्याचे लचके तोडण्याचे अनेक प्रयत्न भाजपाने केले. त्यात त्यांना काही प्रमाणात यश मिळालं. पण सर्वसामान्यांनी ते यश अपयशात बदललं असल्याचंही जयंत पाटील यांनी म्हटलं आहे.
राज्यातील युवक, युवतींनी ‘राष्ट्रवादी’त यावं – अजित पवार
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष गेली 21 वर्षे स्वातंत्र्य, समता, बंधुता, सर्वधर्म समभाव, राष्ट्रीय एकात्मता, लोकशाही, सर्वसमावेश विकासाच्या संकल्पनांवर दृढ विश्वास ठेवून काम करत आहे. मागासवर्गीय, आदिवासी, भटके-विमुक्त बांधव, महिला, अपंग, वयोवृद्ध ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी अशा सर्व समाजघटकांना त्यांचा न्याय्य हक्क मिळवून देण्यासाठी पक्ष काम करत आहे. पक्षाचे पुरोगामी, प्रगतशील विचार, पक्षाची ध्येय-धोरणे आणि आदरणीय शरद पवार साहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून अधिकाधिक युवकांनी, युवतींनी, नागरिकांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात यावं. अधिकाधिक समाजघटकांना पक्षाशी जोडण्यासाठी पक्षपदाधिकारी, कार्यकर्त्यांनी प्रयत्न करावेत, असं आवाहनही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं आहे.
COMMENTS