बंगळुरु – कर्नाटकमध्ये सत्ता स्थापन करण्यासाठी भाजपनं रणनिती आखली असल्याचं बोललं जात आहे. भाजपकडून काँग्रेस आणि जेडीएसचे आमदार फोडण्याचा प्रयत्न केला जात आहे. कर्नाटकमध्ये सत्ता स्थापन करण्यासाठी 112 आमदारांचा पाठिंबा आवश्यक आहे. त्यामुळे 78 जागांवर विजयी झालेल्या काँग्रेसनं काल 37 उमेदवार निवडून आलेल्या जेडीएसला पाठिंबा दिला. त्यामुळे जेडीएसनं राज्यपालांकडे सत्तास्थापनेचा दावा केला. परंतु भाजपाच्या नेतृत्वानं एका रात्रीत जेडीएस आणि काँग्रेसच्या सत्ता स्थापनेच्या स्वप्नांना सुरुंग लावल्याची चर्चा आहे. भाजपानं कर्नाटकात ‘गोवा पॅटर्न’ राबवला आहे. त्यामुळे आज काँग्रेसच्या 12 नवनिर्वाचित आमदारांनी पक्षाच्या बैठकीला दांडी मारली आहे. तर जेडीएसचे दोन आमदार पक्षाच्या संपर्कात नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
दरम्यान भाजपाला बहुमताचा आकडा गाठण्यासाठी आठ आमदारांची आवश्यकता आहे. आणि काँग्रेस-जेडीएसच्या ‘गायब’ झालेल्या आमदारांची एकूण संख्या 14 इतकी आहे. त्यामुळे भाजपा सत्ता स्थापन करण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.
जेडीएसच्या या आमदारांची दांडी
जेडीएसच्या नवनिर्वाचित आमदारांची आज पक्ष कार्यालयात बैठक होती. मात्र या बैठकीला राजा व्यंकटप्पा नायका आणि व्यंकटा राव नाडागौडा हे दोन आमदार अनुपस्थित राहिल्याची माहिती आहे.
काग्रेसच्या आमदारांचीही दांडी
काँग्रेसच्या आमदारांचीही आज पक्ष कार्यालयात बैठक बोलावण्यात आली होती. काँग्रेसचे 78 उमेदवार निवडून आले आहेत. मात्र त्यापैकी 66 आमदार बैठकीला उपस्थित होते. त्यामुळे 12 आमदार नेमके गेले कुठे, याची चर्चा सुरू झाली आहे.
COMMENTS