मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी आज मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आहे. वैयक्तिक कामासाठी ही भेट घेतली असल्याचं वक्तव्य आव्हाड यांनी केलं आहे. परंतु जितेंद्र आव्हाड यांनी शरद पवारांचा निरोप घेऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेतली असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. शिवसेना सत्तेत असतानाही दररोज सरकारवर टीका करत आहे. तर दुसरीकडे भाजपाकडून युतीसाठी प्रयत्न सुरू झाले आहेत. या पार्श्वभूमीवर जितेंद्र आव्हाड यांनी पवारांचा निरोप घेऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेतली असल्याचं बोललं जात आहे.
उद्धव ठाकरेजींची सदीच्छा भेट @uddhavthackeray thanx pic.twitter.com/AaWpcejRRX
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) October 12, 2018
दरम्यान निवडणुका तोंडावर आल्या असल्यामुळे सर्वच राजकीय पक्षांमध्ये सध्या जोरदार हालचाली सुरु आहेत. अशातच आव्हाड यांनी आज मातोश्रीची वारी केली असल्यामुळे राजकीय वर्तुळात नवं वादळ निर्माण झालं आहे. ठाण्यात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेससह भाजपाही आक्रमक झाली आहे. ठाणे महापालिका क्षेत्रातील विधानसभा मतदारसंघांमध्ये शिवसेना- राष्ट्रवादीसह भाजपाही जोर लावत आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना- राष्ट्रवादीत खलबतं झाली असल्याची चर्चा सुरु आहे.
COMMENTS