मुंबई – राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी गणेश नाईकांवर जोरदार टीका केली आहे. नाईक यांना 2014 लाच पक्ष सोडायचा होता. त्यांनी पक्षाची अक्षरश: वाट लावली आहे. दरम्यान केडीएमसी, भिवंडी, मीरा भाईंदर याभागात राष्ट्रवादीची चांगली ताकद असतानादेखील त्याठिकाणी पक्षाची ताकद वाढली नाही असंही ते म्हणालेत. कुठलाही पक्ष घरात बसून चालत नाही अशी जोरदार टीकाही आव्हाड यांनी नाईकांवर केली आहे. तसेच नवी मुंबईत पक्ष पुन्हा उभा राहणार आणि आम्ही सुरवात नवी मुंबईतुनच करणार असल्याचंही आव्हाड यांनी म्हटलं आहे.
दरम्यान 31 जुलै रोजी गणेश नाईक भाजपात प्रवेश करणार असल्याचं बोललं जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या ५२ नगरसेवकांसह गणेश नाईक भाजपामध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे. आज झालेल्या बैठकीत ५२ नगरसेवकांनी भाजपात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. राष्ट्रवादीचे ५२ नगरसेवक भाजपात गेले तर नवी मुंबई महापालिकेतली राष्ट्रवादीची सत्ता जाईल. गणेश नाईक हेदेखील भाजपात प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. त्यांनी मात्र या विषयावर मौन सोडलेलं नाही. राष्ट्रवादीच्या सगळ्या नगरसेवकांनी बैठकीमध्ये एकमुखाने हा निर्णय घेतल्याचे समजते आहे. आता या निर्णयामुळे नवी मुंबईत राष्ट्रवादीला खिंडार पडलं आहे. यावरुनच राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी गणेश नाईकांवर जोरदार टीका केली आहे.
COMMENTS