नवी दिल्ली – मध्य प्रदेशात काँग्रेसला मोठा धक्का बसला असून ज्योतिरादित्य शिंदे यांनी सोनिया गांधी यांच्याकडे राजीनामा सोपवला आहे. राजीनाम्यानंतर त्यांनी पंतप्रधान मोदी यांची भेट घेतली आहे. त्यामुळे शिंदे हे लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचं दिसत आहे. शिंदे यांना भाजपच्या कोट्यातून राज्यसभेवर पाठवण्यात येणार असल्याची माहिती आहे.एकीकडे मध्य प्रदेशात काँग्रेस सरकार पाडण्यासाठी भाजपकडून सर्वोतोपरी प्रयत्न केले जात आहेत. अशातच ज्योतिरादित्य शिंदे यांनी राजीनामा दिल्यामुळे मध्य प्रदेशात काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे.
दरम्यान मध्य प्रदेश विधानसभेचं अधिवेशन 15 मार्चपासून सुरू होत आहे. अधिवेशनच्या पहिल्याच दिवशी भाजप अविश्वास प्रस्ताव सादर करुन काँग्रेसचं सरकार पाडण्याचा प्रयत्न करण्याची दाट शक्यता आहे. ज्योतिरादित्य शिंदेंचे समर्थक असलेल्या मध्य प्रदेश काँग्रेसमधील 17 आमदारांनी बंडाचा पवित्रा घेत बंगळुरू गाठलं आहे. या आमदारांमध्ये कमलनाथ सरकारमधील 6 मंत्र्यांचाही समावेश आहे. 16 मार्चला विधानसभेच्या पहिल्या सत्रात भाजपकडून अविश्वास ठराव आणला जाऊ शकतो. या आमदाराच्या समर्थनाच्या जोरावर काँग्रेसचं सरकार पाडण्याचा भाजपकडून प्रयत्न असणार आहे. त्यामुळे मध्य प्रदेशात काँग्रेसच्या अडचणीत मोठी वाढ झाली असल्याचं दिसत आहे.
COMMENTS