कल्याण – कल्याण डोंबिवली महानगर पालिकेच्या परिवहन समितीच्या ६ जागांसाठी झालेल्या निवडणुकीत महापौरांच्या निर्णायक मतामुळे भाजपाचा उमेदवार विजयी झाला तर मनसेच्या उमेदवाराला पराभव स्वीकारावा लागला आहे. परिवहन समितीचे ६ सदस्य निवृत्त झाल्याने त्यांच्या जागी नवीन सदस्य नियुक्त करण्यासाठी निवडणूक घेण्यात आली. या निवडणुकीत ६ जागांसाठी ७ उमेदवार रिंगणात होते. भाजपाच्या दिनेश गोर आणि मनसेच्या मिलिंद म्हात्रे यांना सम समान मते मिळाल्याने महापौरांनी आपल्या निर्णायक मताचा वापर करत भाजपाच्या दिनेश गोर यांच्याबाजूने मतदान केल्याने मनसेला पराभव स्वीकारावा लागला आहे.
झालेल्या निवडणुकीत शिवसेनेच्या सुनील खारूक यांना सर्वाधिक ११२ मते मिळाली असून सेनेच्याच बंडू पाटील यांना १०६, अनिल पिंगळे यांना ९७ मते मिळाली. तर भाजपाच्या संजय मोरे यांना १०८, स्वप्नील काठे यांना १०५ मते मिळाली. भाजपचेच उमेदवार दिनेश गोर आणि मनसेचे उमेदवार मिलिंद म्हात्रे या दोघांनाही प्रत्येकी ९६ मते मिळाली. या दोन्ही उमेदवारांना समसमान मते असल्याने महापौरांनी आपल्या निर्णायक मताचा वापर करत भाजपा उमेदवाराला मतदान करत मनसेचा पराभव केला आहे.
मनसेने काँग्रेस आणि राष्ट्रवादी मतांवर डोळा ठेवत निडवणूक रिंगणात उडी घेतल्याने सहा जागांसाठी सात उमेदवार रिंगणात असल्याने या निवडणुकीत चुरस निर्माण झाली होती. यावेळी १२० नगरसेवकांनी मतदानाचा हक्क बजावला. यामध्ये शिवसेना – भाजप युतीचे सहाही उमेदवार विजयी झाले.
COMMENTS