मुंबई – राज्यातील विधानसभा निवडणुकीसाठी भाजप-शिवसेनेची युती झाली आहे. राज्यभरात दोन्ही पक्ष एकमेकांचा प्रचार करत आहेत. परंतु काही मतदारसंघात मात्र भाजप-शिवसेनेत मैत्रिपूर्वक लढत होत आहे. त्यापैकीच कणकवली विधानसभा मतदारसंघ होय. या मतदारसंघात भाजपकडून नारायण राणे यांचे पूत्र नितेश राणे तर शिवसेनेकडून सतिश सावंत मैदानात आहेत. या दोन्ही उमेदवारांसाठी आता स्वत: शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मैदानात उतरले आहेत. या मतदारसंघात नितेश राणे यांच्या समर्थनार्थ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे 15 तारखेला तर सतिश सावंत यांच्या समर्थनार्थ उद्धव ठाकरे हे 16 तारखेला कणकवलीत सभा घेणार आहे.
त्यामुळे या मतदारसंघातील निवडणुकीकडे आता राज्याचं लक्ष लागलं आहे.
नुकतेच स्वाभिमान पक्षातून भाजपमध्ये दाखल झालेले नितेश राणे यांना भाजपने कणकवलीमधून उमेदवारी दिली आहे. त्यांच्या प्रचारासाठी येत्या १५ ऑक्टोबर रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कणकवलीमध्ये प्रचारसभा घेणार आहेत. मात्र, त्यांच्याच विरोधात शिवसेना उमेदवार सतीश सावंत यांनी बंडखोरी केल्यामुळे आता सावंतांच्या प्रचारासाठी दुसऱ्या बाजूने उद्धव ठाकरे १६ तारखेला कणकवलीतच प्रचारसभा घेणार आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे हे एकमेकांविरोधात काय बोलणार याकडे लक्ष लागलं आहे.
स्वाभिमान पक्ष भाजपात विलीन करणार
गेली काही दिवसांपासुन खासदार नारायण राणे यांचा स्वाभिमान पक्ष भाजपात विलीन करण्यात येणार असल्याची चर्चा आहे. परंतु याबाबतची तारीख ठरली नव्हती. अखेर स्वत: नारायण राणे यांनी पक्ष विलिनीकरणाची तारीख जाहीर केली आहे.
कणकवली येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची 15 तारखेला जाहीर सभा होणार आहे. या सभेत स्वाभिमान पक्ष भाजपात विलीन करणार असल्याची माहिती खासदार नारायण राणे यांनी दिली आहे.
COMMENTS