कर्नाटक – कर्नाटकमधील विधानसभेची निवडणूक पार पडली आहे. या निवडणुकीच्या मतदानानंतर विविध चॅनल्सचे एक्झिट पोल समोर आले आहेत. या एक्झिट पोलनुसार कर्नाटकात त्रिशंकू परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता वर्तुवली जात आहे. त्यामुळे जनता दल (से) स्वत:ला किंगमेकर मानत आहे. तसेच यामुळे भाजपाला पाठिंबा देऊन जनता दल युतीचे सरकार बनवू शकते, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. परंतु जनता दलानं मात्र हे वृत्त फेटाळलं असून जनता दलाचे (से) प्रवक्ते दानिश अली यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना भाजपाबरोबर जाण्याचा प्रश्नच नसल्याचं म्हटलं आहे. जर काँग्रेसला १०० पेक्षा कमी जागा मिळाल्या तर पाठिंब्यासाठी संवाद साधण्याची त्यांची जबाबदारी असल्याचंही दानिश अली यांनी म्हटलं आहे.
दरम्यान याबाबत जनता दलाचे (से) प्रमुख एच डी देवेगौडा यांनी सध्या आपण कोणतीही गोष्ट स्वीकारण्यास किंवा फेटाळण्याच्या मनस्थितीत नसल्याचं म्हटलं आहे. १५ मे रोजी मतमोजणी आहे. तेव्हा निकाल येतात ते पाहू असं त्यांनी म्हटलं आहे. तसेच बहुमत प्राप्त न करण्याच्या स्थितीत काँग्रेस आल्यास त्यांना पाठिंबा द्याल काय असा सवाल विचारला असता, पाठिंब्यासाठी काँग्रेसने प्रथम संवाद साधण्याची जबाबदारी असणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, कर्नाटक विधानसभा निवडणुकीसंबंधी आतापर्यंत नऊ मतदानोत्तर चाचणींचे कल समोर आले आहेत. सर्वांनीच त्रिशंकूचेच संकेत दिले आहेत. तसेच या निवडणुकीत जनता दलाला (से) ३१ ते ३२ जागा मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे कर्नाटकमध्ये जनता दल (से) किंगमेकर ठरण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या निवडणुकीच्या निकालानंतरच आपली भूमिका स्पष्ट करणार असल्याचं देवगौडा यांनी म्हटलं आहे.
COMMENTS