जागावाटपावरुन काँग्रेस-जेडीएसमधील तिढा वाढला, काँग्रेसची शरद पवारांकडे धाव !

जागावाटपावरुन काँग्रेस-जेडीएसमधील तिढा वाढला, काँग्रेसची शरद पवारांकडे धाव !

नवी दिल्ली – लोकसभा निवडणूक तोंडावर आली असताना काँग्रेसची डोकेदुखी आणखी वाढत चालली आहे. कर्नाटकमध्ये जनता दल सेक्युलर (JDS) ने काँग्रेसकडे लोकसभेच्या १२ जागांची मागणी केली आहे. परंतु याठिकाणी जेडीएसला १२ जागा सोडणे शक्य नसल्याने हा तिढा सोडवण्याचं आव्हान काँग्रेससमोर येऊन ठेपलं आहे. हा तिढा सोडवण्यासाठी काँग्रेसने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष शरद पवार, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू आणि जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला यांच्याकडे मदत मागितली आहे.

दरम्यान एनडीएविरोधात राष्ट्रीय आघाडी स्थापन करण्यासाठी येणारे अडथळे शरद पवार, चंद्राबाबू नायडू आणि फारुख अब्दुल्ला यांनी दूर करावे अशी अपेक्षा काँग्रेसनं व्यक्त केली आहे. परंतु प्रादेशिक पक्षांना जितक्या जागांवर विजय मिळवणं शक्य आहे, असं वाटतेय तितक्या जागा मागणे हा त्यांचा हक्क असल्याचं टीडीपीचे प्रवक्ते के. राममोहन राव यांनी म्हटले आहे. कर्नाटकात सत्ताधारी काँग्रेस आणि जेडीएस यांच्यात सर्व पदांसाठी २:१ अशी विभागणी करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.

हा फॉर्म्युला लागू केल्यास राज्यातील २८ पैकी लोकसभेच्या १० जागा जेडीएसला मिळू शकतात. असंही राममोहन राव यांनी म्हटलं आहे. तसेच जेडीएसचे सर्वेसर्वा एच. डी. देवेगौडा यांनीही १२ जागांवर लोकसभा निवडणूक लढवणार असल्याची घोषणा यापूर्वीच केली होती. ही मागणी पूर्ण न झाल्यास जेडीएस स्वतंत्रपणे निवडणुकीला सामोरे जाईल, असेही त्यांनी म्हटले होते. त्यामुळे काँग्रेस-जेडीएसमधील हा तिढा आता कसा सुटणार हे पाहणं गरजेचं आहे.

COMMENTS