कल्याण – कल्याण-डोंबिवली महापालिकेत शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. पक्षाच्या नगरसेविका आणि माजी महापौर वैजयंती घोलप यांचं नगरसेवकपद रद्द झालंय. घोलप या शिवसेनेच्या ज्येष्ठ नगरसेविका आहेत. त्या कल्याणच्या रामबाग प्रभागातून आत्तापर्यंत सलग पाचवेळा नगरसेविका म्हणून निवडून आल्या होत्या. २०१० नंतर त्यांचा प्रभाग ओबीसी प्रवर्गासाठी राखीव झाल्यानंतर त्यांनी धनगर जातीचं प्रमाणपत्र जोडत निवडणूक लढवली होती. त्यानंतर त्यांना महापौरपदही मिळालं होतं. मात्र घोलप या धनगर नसून खाटीक आहेत, तसंच खाटीक ही जात अनुसूचित जमातींमध्ये येत असल्यानं त्यांनी ओबीसी प्रवर्गातून लढवलेली निवडणूक रद्द ठरवण्याची मागणी प्रतिस्पर्धी भाजप उमेदवार गौरव गुजर यांनी केली होती. त्यानुसार झालेल्या सुनावणीत पुराव्यांच्या आधारे जातवैधता समितीने घोलप या धनगर नसून खाटीक असल्याचा निकाल देत त्यांचं ओबीसी प्रमाणपत्र रद्द केलं.
जातवैधता पडताळणी समितीचा हा निर्णय अन्यायकारक असल्याचा आरोप करत घोलप यांनी याविरोधात उच्च न्यायालयात दाद मागितली. मात्र तिथेही त्यांची याचिका फेटाळून लावण्यात आल्यानं केडीएमसी आयुक्त गोविंद बोडके यांनी वैजयंती घोलप यांच्यावर अपात्रतेची कारवाई करत त्यांचं नगरसेवकपद रद्द केलं. या निर्णयामुळे केडीएमसीत सत्ताधारी असलेल्या शिवसेनेला मोठा झटका बसला आहे. आता ऐन लोकसभा निवडणुकांच्या धामधुमीत रामबाग प्रभागात पोटनिवडणूक होण्याची शक्यता असून त्यावेळी शिवसेना आणि भाजपचा कस लागणार आहे.
COMMENTS