मुंबई – लाच मागितल्याप्रकरणी शिवसेनेच्या नगरसेवकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अँटी करप्शन विभागाने हा गुन्हा दाखल केला आहे. कल्याण महापालिकेतील गोरख जाधव असे या शिवसेना नगरसेवकाचे नाव असून ते प्रभाग क्रमांक 7 येथील लोकप्रतिनिधी आहेत. संबंधीत कंत्राटदाराच्या कंपनीला या प्रभागात महापालिकेकडून रस्ता आणि गटार बांधणीचे काम देण्यात आले होते. या कामामध्ये कोणताही अडथळा न आणण्यासाठी कंत्राटदाराला मिळणाऱ्या एकूण रकमेच्या 10 टक्के म्हणजेच 1 लाख रुपये रकमेची गोरख जाधव याने मागणी केली आहे.
त्याबाबत तक्रारदाराने नवी मुंबई अँटी करप्शन विभागाकडे तक्रार दिली. त्याची पडताळणी केल्यानंतर आज सकाळी पावणे बाराच्या सुमारास नवी मुंबई अँटी करप्शनने त्याच्यावर खडकपाडा पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध सण 1988 च्या कलम 7 नुसार गुन्हा दाखल केला आहे.दरम्यान केडीएमसीचे अनेक अधिकारी कर्मचाऱ्यांना यापूर्वी अँटी करप्शनने पकडले असताना त्यात आता लोकप्रतिनिधिंचीही भर पडली असल्याचं दिसत आहे. त्यामुळे खाबूगिरी काहीही केल्या थांबण्याचे नाव घेत नसल्याचं दिसत आहे.
COMMENTS