संगीताताई नव्हे तर ‘या’ ताईंना मिळणार केजमधून उमेदवारी, भाजप कार्यकर्त्यांचा दावा !

संगीताताई नव्हे तर ‘या’ ताईंना मिळणार केजमधून उमेदवारी, भाजप कार्यकर्त्यांचा दावा !

केज – बीड जिल्ह्यात आगामी विधानसभेचे वारे जोरात वाहत आहेत. भाजपाकडून इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती देखील घेण्यात आल्या आहेत. केज मतदारसंघातून भाजपच्या विद्यमान आमदार संगिता ठोंबरे, सविता मस्के, बाळासाहेब मस्के यांच्यासह सात जणांनी मागच्या आठवड्यात पक्षश्रेष्ठींसमोर मुलाखती दिल्या आहेत. यामुळे आगामी विधानसभेची माळ कोणाच्या गळ्यात पडणार ? याकडे येथील जनतेचे लक्ष लागले आहे. परंतु तत्पूर्वी केज विधानसभा मतदारसंघातून भाजप आपल्यालाच उमेदवारी देणार असल्याचा दावा गेवराई तालुक्यातील रेवकी गटाच्या जिल्हा परिषद सदस्या सविता बाळासाहेब मस्के यांच्या कार्यकर्त्यांनी केला आहे.

दरम्यान विद्यमान आमदार संगिता ठोंबरे यांनी पाच वर्षात मतदारांकडे पाठ फिरवल्याने त्यांच्या उमेदवारीवर मतदारातून नाराजीचा सूर निघत आहे. त्यातच भाजपचा मित्र पक्ष असलेला मित्र पक्ष शिवसेनेनेदेखील ठोंबरे यांना परत उमेदवारी दिल्यास काम करणार नसल्याचे जाहीर केले आहे. तसेच सुतगिरणी प्रकरणी देखील कोर्टाने त्यांच्यावर ताशेरे ओढत गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे त्यांच्या अडचणीत वाढ झाली असून त्यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता धुसर बनली असल्याचं दिसत आहे. त्यामुळे भाजप आपल्यालाच उमेदवारी देणार असल्याचे सविता मस्के यांच्या कार्यकर्त्यांनी म्हटले आहे.

भाजपाच्या गेवराई तालुक्यातील रेवकी गटाच्या जिल्हा परिषद सदस्या असलेल्या सविता मस्के यांनी पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा परिषदेच्या माध्यमातून कोट्यवधींचा निधी उपलब्ध करून गटांतर्गत विविध विकासकामे केली आहेत. केज मतदारसंघातील स्थानिक नेत्यांची सविता यांच्याच नावाला सहमती असल्याची चर्चा आहे. सविता मस्के यांचे पती बाळासाहेब मस्के हे भाजपा युवा मोर्चाचे प्रदेश सचिव आहेत.

सविताताई व त्यांचे पती बाळासाहेब मस्के यांनी जन्मभूमी असलेल्या केज मतदारसंघात विविध नाविण्यपूर्ण उपक्रम राबवून तसेच मतदारांचे मोठे संघटन करुन पक्षश्रेष्ठींचे लक्ष वेधलेले आहे. त्यामुळे आपल्या दुरदृष्टी व विकसनशील नेतृत्व गुणावर भाजप पक्षश्रेष्ठीं आगामी विधानसभेत अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या केज विधानसभेच्या जागेवर पक्षश्रेष्ठी आपल्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब करतील असा दावा कार्यकर्त्यांनी केला आहे.

COMMENTS