बुलडाणा – सिंदखेडराजा येथे घेण्यात आलेल्या महाराष्ट्र संकल्प सभेत दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पार्टीचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी भाजप सरकारवर जोरदार टीका केली आहे. भाजपचा इतिहास हा दंगलीचा असून दोन समाजांत भांडणे लावून राजकारण करण्याची त्यांची पद्धत असल्याचं अरविंद केजरीवाल यांनी म्हटलं आहे.तसेच भीमा कोरेगाव येथे देखील भाजपा आणि आरएसएसने दंगल घडवून आणली असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. महाराष्ट्रातील शिक्षण व्यवस्थेवरही त्यावेळी केजरीवाल यांनी भाजपवर टीका केली आहे. महात्मा जोतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या शिक्षणाचा वसा दिल्ली सरकारने उचलला आहे. ४० हजार कोटींचे बजेट असताना आप सरकार सर्वांना मोफत आणि दर्जेदार शिक्षण देत आहे. परंतु महाराष्ट्रात 3 लाख कोटींचे बजेट असताना सरकारी शाळा विक्रीला काढल्या जात असल्याची टीका त्यांनी फडणवीस सरकारवर केली आहे.
दरम्यान शेतक-यांच्या प्रश्नावर बोलत असताना त्यांनी भाजप सरकारला शेतक-यांची चिंता नसल्याचं म्हटलं आहे. शिवाजी महाराजांचे नाव घेत शेतकरी कर्जमाफीची घोषणा केली जात आहे मात्र, अद्याप याची अंमलबजावणी झालेली नाही. दिल्ली सरकारने शेतकऱ्यांना सर्वांत जास्त मदत केली असल्याचा दावाही त्यांनी यावेळी केला. त्याचबरोबर देशात सर्वात स्वस्त वीज दिल्ली सरकार देत असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. तसेच यावेळी केजरीवाल यांनी महाराष्ट्रातील आगामी विधासभा निवडणुकीचे बिगूल फुंकले असून यावेळी ब्रिगेडियर सुधीर सावंत यांच्यासह त्यांच्या कार्यकर्त्यांनी आपमध्ये प्रवेश केला आहे.
COMMENTS