एकनाथ खडसेंना काँग्रेसचे आमंत्रण ? सचिन सावंत यांच्या ट्विटने चर्चेला उधाण !

एकनाथ खडसेंना काँग्रेसचे आमंत्रण ? सचिन सावंत यांच्या ट्विटने चर्चेला उधाण !

मुंबई – मंगळवारी मुंबईत आलेल्या काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी भाजप सरकार आणि मोदींवर टीका करताना मोदी ज्येष्ठांचा कसा अवमान करतात हे सांगितलं होतं. आपल्या गुरूची मोदींना किंमत नाही असं सांगत लालकृष्ण अडवाणी यांचा आदर आणि सन्मानाचं रक्षण काँग्रेस पक्ष करेल असं वक्तव्य केलं होतं. त्यानंतर आता त्याच धरतीवर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी महाराष्ट्रात खडसेंसारख्या नेत्यांचा भाजपमध्ये मान सन्नाम ठेवला जात नाही. त्याचं रक्षण महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस करेल असं ट्विट केलंय.

सचिन सावंत यांच्या या ट्विटवरुन राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलंय. खडसे भाजपमध्ये नाराज आहेत. त्यांनी अनेकवेळा आपली नाराजी बोलूनही दाखवली आहे. त्यामुळेच ते कधी काँग्रेसच्या तर कधी राष्ट्रवादीच्या संपर्कात असल्याची चर्चा होत आहे. कालच त्यांनी छगन भुजबळ यांच्यावर अन्याय झाल्याचं सांगत अप्रत्यक्षपणे सरकावर टीका केली आहे. ओबीसी नेत्यांवर भाजपमध्ये अन्याय होत असल्याचंही त्यांनी सांगितलं. त्याच्या दुस-याच दिवशी सचिन सावंत यांनी हे ट्विट केल्यामुळे खडसेंना काँग्रेसनं पक्षात येण्याचं आमंत्रण दिल्याची चर्चा सुरू झाली आहे.

दोनच दिवसांपूर्वी फडणवीस सरकारमधील एका मंत्र्यावर खडसे यांनी हल्लाबोल केला होता. आपल्याला अंजली दमानिया यांनी नाही तर राज्यमंत्रीमंडळातील एका मंत्र्यानेच त्रास दिल्याचा थेट आरोप केला होता. त्यांचा निषाणा हे गिरीश महाजन असल्याची चर्चा आहे. महाजन हे मुख्यमंत्र्यांच्या अत्यंत निकटचे समजले जातात. त्यामुळे खडसेंचा रोख हा मुख्यमंत्र्याच्या दिशेने असल्याचीही चर्चा राजकीय वर्तुळात आहे. त्यामुळे खडसे काँग्रेसच्या वाटेवर आहेत असंही बोललं जातंय. खरंच ते बाहेर पडणार की पक्षातलं महत्व वाढवण्यासाठी ते असा खटाटोप करत आहेत. ते येत्या काही दिवसातच स्पष्ट होईल.

COMMENTS