नवी दिल्ली – भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची दिल्लीत जाऊन भेट घेतली आहे. शरद पवार यांच्या 6 जनपथ या निवासस्थानी एकनाथ खडसे यांच्यात राजकीय विषयावर चर्चा झाली. त्यांनी पवारांसोबत जवळपास अर्धा तास चर्चा केली. या भेटीनंतर सिंचन प्रकल्पाच्या प्रश्नावर पवारांची भेट घेतल्याचं खडसेंनी म्हटलं आहे. पवारांच्या या भेटीनंतर उद्या खडसे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या भेटीला जाणार असल्याची माहिती आहे.
त्यामुळे राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लावले जात आहेत.
दरम्यान काही दिवसांपूर्वीच एकनाथ खडसे यांनी पक्षावर नाराजी व्यक्त केली होती. पंकजा मुंडे आणि रोहिणी खडसे यांचा पराभव पक्षातील लोकांमुळेच झाला. कोणी पक्षविरोधात काम केले त्यांची नावासहित आपण वरिष्ठांकडे तक्रार केली आहे. पक्षाकडून आता काय कारवाई होते त्याची प्रतिक्षा असल्याचं एकनाथ खडसे म्हणाले होते.
तसेच पक्ष उभारणीसाठी मी मेहनत घेतली. परंतु त्याच पक्षाने मला फळ काय दिले? मला पक्षात बदनाम करण्याचा प्रयत्न करण्यात आला. वेगवेगळ्या चौकशीचे आदेश दिले, कोणतेही कारण नसताना पक्षाने माझ्यावर कारवाई का केली?, मला पक्षाच्या सुकाणू समितीवरून काढण्यात आले. जाणीवपूर्वक पक्षातून दूर करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. तरीही मी यांची आरती करावी काय? असंही एकनाथ खडसे म्हणाले होते. या टीकेनंतर आज एकनाथ खडसे यांनी दिल्लीत जाऊन शरद पवारांची भेट घेतल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. तसेच उद्या उद्धव ठाकरेंसोबत काय चर्चा करणार याकडे लक्ष लागलं आहे.
COMMENTS