ठाणे – रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीनंतर कोकणात पुन्हा एकदा पदवीधर मतदारसंघाचं धूमशान सुरू झालं आहे. या मतदारसंघाचं प्रतिनिधीत्व करणारे आमदार निरंजन डावखरे यांनी नुकताच भाजपमध्ये प्रवेश केला आहे. तंसच भाजपकडून निरंजन डावखरे यांची उमेदावारीही जवळपास निश्चित आहे. त्यामुळे आता राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांचे उमेदवार कोण याबाबत चर्चा सुरू आहे.
डावखरेंनी अचानक भाजपात प्रवेश केल्यामुळे राष्ट्रवादीला आता नवा उमेदवार शोधण्याची वेळ आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून ठाण्यातील ज्येष्ठ नगरसेवक नजीब मुल्ला यांचं नाव चर्चेत आहे. नजीब मुल्ला हे उच्चशिक्षीत असून राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जातात. त्यांचेही ठाण्यातील सर्वपक्षीय नेत्यांशी चांगले संबंध आहेत. त्याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेस ही जागा शेतकरी कामगार पक्षासाठी सोडण्याची शक्यता आहे. तसं झाल्यास शेकाप नेते जयंत पाटील यांच्या सून चित्रलेखा पाटील या रिंगणात उतरण्याची शक्यता आहे.
चित्रलेखा पाटील यांचं शिक्षण क्षेत्रात चांगलं काम आहे. तसंच तटकरे यांच्याप्रमाणे जंयत पाटील यांचेही सर्व पक्षाच चांगले संबंध आहेत.र त्याचा फायदा चित्रलेखा पाटील यांना होण्याची शक्यता आहे. कोकण पदवीधर मतदारसंघात ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या पाच जिल्ह्यांचा समावेश होतो. या निवडणुकीत नारायण राणे, हितेंद्र ठाकूर यांची भूमिकाही महत्वाची ठरणार आहे. ते कोणत्या उमेदवाराला पाठिंबा देतात त्यावरही बरीच समिकरणे अवलंबून आहेत.
भाजपकडून विनय नातू इच्छुक होते. मात्र निरंजन डावखरे यांच्या भाजप प्रवेशामुळे आता त्यांना माघार घ्यावी लागणार आहे. शिवसेनेकडून ठाण्याचे माजी महापौर संजय मोरे यांचं नाव चर्चेत आहे. शिवसेनेनं उमेदवार उभा केल्यास निवडणूक चुरशीची होण्याची शक्यता आहे. या मतदारसंघात सर्वात जास्त मतदार हे ठाणे जिल्ह्यातील आहेत. तर सर्वात कमी मतदार हे सिंधुदुर्ग जिल्यातील आहेत.
COMMENTS