लातूर लोकसभेसाठी “या” इच्छुकांची  मोर्चेबांधणी, विद्यमान खासदारांना तिकीट मिळणार का ?

लातूर लोकसभेसाठी “या” इच्छुकांची  मोर्चेबांधणी, विद्यमान खासदारांना तिकीट मिळणार का ?

लातूर – लोकसभा निवडणूक आता केवळ 6 महिन्यांवर येऊन ठेपली आहे. त्यामुळे सर्वच पक्ष निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. सर्वच पक्ष उमेदवारांची चाचपणी करत आहेत. तर इच्छुक तिकीट मिळवण्यासाठी लॉबिंग करत आहेत. लातूर हा अनुसुचित जातीसाठी राखीव मतदारसंघ आहे. भाजपचे सुनिल गायकवाड सध्या लातूरचे खासदार आहेत. तिकीट मिळवण्यात ते पुन्हा यशस्वी होतात की त्यांचा पत्ता कट केला जातो याकडं राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे. तसंच एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेला लातूर मतदारसंघ पुन्हा खेचण्यात काँग्रेस यशस्वी होते का ? ते पहावं लागेल.

भाजपकडून सध्या विद्यमान खासदार सुनिल गायकवाड यांचं नाव आघाडीवर आहे. मी मोदींच्या आवडत्या पहिल्या 10 खासदारांमध्ये आहे. माझी संसदेत उपस्थिती चांगली आहे. तसंच माझी कामगिरी चांगली आहे. भाजपच्या हायकमांडशी चांगले संबंध आहेत. त्यामुळे लोकसभेचं तिकीट मलाच मिळणार असा दावा सुनिल गायकवाड करत आहेत.  लोकांची छोटीमोठी कामे होत नसल्यामुळे मतदारसंघात खासदारंविषयी काही प्रमाणात नाराजी आहे. तसंच स्थानिक कार्यकर्थ्यांशी त्यांचं फारसं सख्य नाही. मतदारसंघात एकला चलो रे चा त्यांचा नारा असतो असा आक्षेप कार्यकर्त्यांकडून घेतला जातो. तसंच वरुन दाखवत असले तरी पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांच्याशी त्यांचे फारसे चांगले संबंध नसल्याचंही बोललं जातंय. त्यामुळे गायकवाड यांना तिकीट मिळेल की नाही याविषयी साशंकता व्यक केली जात आहे.

भाजपकडून विद्यामान जिल्हा परिषद सदस्य सुधाकर श्रृंगारे हेही इच्छुक आहेत. श्रृंगारे हे मुंबईमध्ये मोठे व्यावसायिक आहेत. आर्थिकदृष्ट्या सबळ आहेत. त्याचसोबत पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांचे अत्यंत जवळचे समजले जातात. अलीकडच्या काळात मतदारसंघात संभाजी पाटील यांचा कार्यक्रम असेल तेंव्हा सुधाकर श्रृंगारे यांची लागलेली पोस्टर बरच काही सांगून जातात. संभाजी पाटील हे मुख्यमंत्र्यांचे अत्यंत लाडके मंत्री समजले जातात. काँग्रेसचा  आजपर्यंतचा अभेद्य किल्ला भाजपने उद्धवस्त केला त्यामध्ये निलंगेकरांचा  मोठा वाटा आहे. महापालिका, जिल्हा परिषद, जिल्ह्यातील बुहुतेक नगरपालिका, नगरपंचायती, पंचायत समित्या भाजपने काबिज केल्या आहेत. त्यामुळे निलंगेकर यांच्या शिफारशीला महत्व आहे. त्यामुळेच सुधाकर श्रृंगारे यांचं पारडंही जड मानलं जातंय.

सुनिल गायकडवाड आणि सुधाकर श्रंगारे यांच्यात तिकीट वाटपावरुन वाद झालाच तर कदायित उद्गीरचे आमदार सुधाकर भालेराव यांचंही नाव पुढं येऊ शकतं. मात्र ते स्वतः लोकसभा लढवण्यास फारसे इच्छुक नसल्याचं बोललं जातंय. शिवसेनेची जिल्ह्यात फारशी ताकद नाही. तरीही शिवसेनेनं स्वबळावर जागा लढवल्यास शिवसेनेकडून लातूर महापालिकेतील माजी नगरसेवक सुनिल बसपुरे यांचं नाव पुढे येऊ शकतं.

काँग्रेस राष्ट्रवादीमध्ये ही जागा काँग्रेसकडे आहे. त्यामुळे ती काँग्रेसकडेच राहण्याची शक्यता आहे. काँग्रेसकडे दलित युवा पँथरचे विनोद खटके यांचं नाव चर्चेत आहे. आमदार अमित देशमुख यांचे ते जवळचे आहेत. संघटनेच्या माध्यमातून ते सध्या सक्रीय आहेत. मात्र त्यांनी अजून काँग्रेसमध्ये अधिकृत प्रवेश केलेला नाही. काँग्रेसमधून दुसरं नाव म्हणज्ये पृथ्वीराज शिरसाट यांचं घेतलं जात आहे. सिरसाट हे जिल्हा सहकारी बँकेचे उपाध्यक्ष आहेत. माजी आमदार दिलीपराव देशमुख यांचे ते जवळचे समजले जातात. काँग्रेसमधील मवाळ चेहरा म्हणून त्यांच्याकंड पाहिलं जातं. त्यांचे वडीलही स्वर्गीय विलासराव देशमुख यांचे कार्यकर्ते होते. त्यामुळं सिरसाट यांचही नाव काँग्रेसकडून आघाडीवर असल्याची चर्चा आहे.

COMMENTS