सोलापूर – गेल्या अनेक दिवसांपासून भाजपात प्रवेश करण्यासाठी आसुसलेले माजी मंत्री प्रा. लक्ष्मण ढोबळे यांनी मंगळवारी सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या निवासस्थानी आल्यानंतर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे आशीर्वाद घेतले.तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सत्कारही केला. ढोबळे गेल्या अनेक दिवसांपासून भाजपच्या संपर्कात आहेत. मात्र काही तांत्रिक कारणामुळे त्यांना प्रवेशापासून दूर रहावे लागत आहे. मंगळवारी ढोबळे यांनी गडकरी यांचे आशीर्वाद घेतल्याने आता पुन्हा एकदा ढोबळे भाजपात जाणार असल्याची जोरदार चर्चा सुरु झाली आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या साक्षीने ढोबळे भाजपच्या गोटात वावरत असल्याने त्यांची भाजपात जाण्याची शक्यता बळावली आहे. सोलापूर लोकसभेसाठी ढोबळे सेनेच्या संपर्कात असल्याचेही बोलले जात असताना मंगळवारी त्यांनी फडणवीस यांची भेट तर गडकरी यांचे आशीर्वाद घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. इकडे कोठे परिवारातील नगरसेवकही फडणवीस यांना भेटल्याने आज ना उद्या राजकीय भूकंप होणार काय? या चर्चेला उत आला आहे.
माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली आहे. त्यानंतर त्यांच्यावर एका प्रकरणात न्यायालयात केसही सुरू आहे.त्यामुळे भाजप पक्षात प्रवेश करण्यासाठी आपल्याला तांत्रिक अडचण येत असल्याचे यापूर्वीच ढोबळे यांनी सांगितले होते. या अगोदरही ढोबळे फडणवीस यांना भेटले आहेत.शिवाय याच कारणासाठी ढोबळे यांनी दोनही देशमुख मंत्र्यांची भेटही घेतली आहे. ढोबळे यांना आगामी लोकसभा किंवा विधानसभा लढवायची आहे. मिळेल ती संधी पदरात पाडून घेण्यासाठी त्यांनी तयारी दर्शविली आहे. भाजप तर भाजप आणि सेना तर सेना , त्यामुळे ढोबळे यांची पक्षप्रमुखांच्या भेटीगाठी दिवसेंदिवस वाढत चाललेल्या आहेत.राजकारणात कधीही काहीही होऊ शकते. त्यामुळे ढोबळे आणि कोठे यांच्या सध्याच्या हालचाली बरेच काही सांगून जात आहेत.
COMMENTS