मुंबई – फेब्रुवारी महिन्यात आठ लोकसभा मतदारसंघातील पोटनिवडणुका होणार आहेत. या पोटनिवडणुकांसाठी भाजसमोर मोठं आव्हान असल्याचं दिसत आहे. कारण काही दिवसांपूर्वीच गुजरातमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपचा कौल कमी झाला असल्याचं पहायला मिळालं आहे. तसेच पंजाबमध्ये ऑक्टोबरमध्ये घेण्यात आलेल्या पोटनिवडणुकीत काँग्रेसनं भाजपला पराभवाची धूळ चारली होती. यावरुन भाजपाचा कल कुठेतरी कमी होत चालल्याचं दिसत आहे. त्यामुळे फेब्रुवारीत होणा-या आठ लोकसभा पोटनिवडणुकीत भाजपचं अस्तित्व पणाला लागणार आहे. या आठही जागावर विजय मिळवण्यासाठी भाजपनं आतापासूनच तयारी सुरु केली आहे.
‘या’ आठ ठिकाणी होणार पोटनिवडणूका !
1 – महाराष्ट्रातील भंडारा मतदारसंघात पोटनिवडणूक होणार असून, भाजप खासदार नाना पटोले यांनी पक्षाविरोधी बंड करून राजीनामा दिला होता.
2 -उत्तर प्रदेशातील फुलपूर मतदारसंघात दुसरी पोटनिवडणूक होणार आहे, उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांनी खासदारकी सोडल्यामुळे याठिकाणी पोटनिवणूक घेण्यात येणार आहे.
3 – उत्तर प्रदेश गोरखपूर मतदारसंघात योगी आदित्यनाथ यांनी मुख्यमंत्री झाल्यानंतर खासदारकीचा राजीनामा दिल्यामुळे त्याठिकाणी पोटनिवडणूक होणार आहे.
4 – बिहारमधील अररिया मतदारसंघात पोटनिवडणूक होणार असून राष्ट्रीय जनता दलाचे खासदार तस्लिमुद्दीन यांचे निधन झाल्याने त्याठिकाणी पोटनिवडणूक होणार आहे.
5 – पश्चिम बंगालमधील उलबेरिया मतदारसंघात तृणमूल काँग्रेसचे खासदार सुल्तान अहमद यांचे निधन झाल्यामुळे त्याठिकाणी पोटनिवडणूक घेण्यात येणार आहे.
6 – राजस्थानमधील अजमेर मतदारसंघात भाजप खासदार सांवरलाल जाट यांचे निधन झाल्यामुळे त्याठिकाणी पोटनिवडणूक घेण्यात येणार आहे.
7 – राजस्थानमधील अलवर मतदारसंघात भाजप खासदार महंत चांदनाथ यांचे निधन झाल्याने त्याठिकाणी पोटनिवणूक घेण्यात येणार आहे.
8 – जम्मू-काश्मीरमधील अनंतनाग मतदारसंघात मेहबुबा मुफ्ती यांनी मुख्यमंत्री झाल्यावर खासदारकीचा राजीनामा दिल्यामुळे त्याठिकाणी पोटनिवडणूक होणार आहे.
लोकसभेच्या या आठ जागांपैकी भाजपकडे चार जागा आहेत. त्यामुळे त्या राखण्याचे मोठे आव्हान भाजपसमोर असून या आठही जागांवर भाजपविरोधात काँग्रेसचे तगडे उमेदवार उभे राहणार आहेत. तसेच पुढील दीड वर्षात लोकसभा निवडणुका होणार असल्यामुळे या जागा जिंकून भाजपला आपलं अस्तित्व काय ठेवावं लागणार आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांना या आठ जागांसाठी तारेवरची कसरत करावी लागणार असल्याचं दिसून येत आहे.
COMMENTS