मुंबई – राज्यातील भाजपमधील काही विद्यमान खासदारांना आगामी लोकसभा निवडणुकीत उमेदवारी देण्यात आलेली नाही. त्यामुळे यापैकी काही खासदार नाराज असून ते बंडखोरीच्या तयारीत आहेत. जळगावमधील भाजपचे विद्यमान खासदार ए. टी. पाटील यांनीही उमेदवारी नाकारल्यामुळे तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. मंत्री गिरीश महाजन यांनी घात केल्याची सल अशोक पाटील यांनी बोलून दाखवली आहे. त्यामुळे अशोक पाटील हे बंडखोरीच्या तयारीत असल्याचं बोललं जात आहे.
दरम्यान जळगाव लोकसभा मतदारसंघात भाजपने विद्यमान खासदार पाटील यांना डावलून आमदार स्मिता वाघ यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे मतदारसंघात माझे चांगले काम आहे. सलग दोन वेळेला मी भरघोस मतांनी विजयी झालो होतो, तरीही माझं तिकीट कापलं जाणं, हा माझ्यावर मोठा अन्याय असल्याचं पाटील यांनी म्हटलं आहे.
याच पार्श्वभूमीवर आपली भूमिका मांडण्यासाठी पाटील यांनी पारोळा शहरात कार्यकर्ता मेळाव्याचं आयोजन केलं होतं. यावेळी त्यांनी आपली नाराजी बोलून दाखवली आहे. भाजपकडे अजूनही वेळ आहे, त्यांनी माझ्या नावाचा विचार करावा. असंही पाटील यांनी म्हटलं आहे.
COMMENTS