‘या’ लोकसभा मतदारसंघातील निवडणूक रद्द होणार?

‘या’ लोकसभा मतदारसंघातील निवडणूक रद्द होणार?

नवी दिल्ली – घोडेबाजार वाढल्यामुळे एका लोकसभा मतदारसंघाची निवडणूक रद्द होण्याच्या मार्गावर आहे.  तामिळनाडूतील वेल्लोर लोकसभा मतदारसंघातून डीएमके उमेदवाराच्या कार्यालयामधून मोठी रक्कम जप्त करण्यात आली आहे. या घटनेनंतर या मतदारसंघातील निवडणूक रद्द होण्याची शक्यता व्यक्त केली जाते आहे. निवडणूक आयोगानं याबाबत राष्ट्रपतींना शिफारस पाठवल्याची माहिती आहे. नियमानुसार, लोकसभा निवडणुकीची अधिसूचना जारी करण्याचा अधिकार राष्ट्रपतींकडे आहे, त्यामुळे अशा परिस्थितीत निवडणूक रद्द करण्याचाही अधिकार त्यांनाच असतो.

दरम्यान सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, डीएमके उमेदवाराच्या कार्यालयामधून काही दिवसांपूर्वी मोठी रक्कम हस्तगत करण्यात आली होती. त्यानंतर १० एप्रिल रोजी आयकर विभागाच्या अहवालावर जिल्हा प्रशासनानं डीएमके उमेदवार कातिर आनंद यांच्यासोबत आणखीन दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. डीएमके नेते कातिर आनंद ज्येष्ठ नेते दुरई मुरुगन यांचे पुत्र आहेत.

सध्या ते वेल्लोर मतदारसंघातून पक्षाचं प्रतिनिधित्व करत आहेत. तामिळनाडूच्या सर्व म्हणजेच ३९ मतदारसंघांत १८ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. अशावेळी निवडणूक आयोगाकडून वेल्लोर मतदारसंघाबद्दल लवकरात लवकर निर्णय येण्याची शक्यता आहे. त्यामुळे याबाबत आता राष्ट्रपती काय निर्णय घेतील हे पाहण गरजेचं आहे.

COMMENTS