पुणे – आगामी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपला आणखी एक मोठा धक्का बसणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. कारण भाजपचे विद्यमान खासदार संजय काकडे यांनी पक्षावर जाहीर नाराजी व्यक्त केली आहे. भाजपमधील काही सोंगाड्यांमुळे आपण पक्षापासून दुरावलो असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मला भावासारखे आहेत. पण भावाने लाथ मारल्यावर दुसरे घर शोधावेच लागते असं वक्तव्य काकडे यांनी केलं आहे.काकडे हे लोकसभेच्या उमेदवारीसाठी इच्छुक आहेत. मात्र भाजपने इतर नेत्यांचीच नावे चर्चेत आणल्याने काकडेंनी थेट आघाडीच्या नेत्यांच्या गाठीभेटी सुरू केल्या आहेत.
दरम्यान संजय काकडे यांनी आज पुण्यात राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांची भेट घेऊन आपली मोर्चेबांधणी केली आहे.यावेळी त्यांनी भाजपमधील नेत्यांवर नाराजी व्यक्त केली आहे. या भेटीनंतर बोलताना काकडे यांनी काही सोंगाड्यांमुळे भाजपमध्ये कोंडी झाल्याचे सांगितले. भाजप आता खासदारकीसाठी कोणतीही नावे पुढे आणत आहेत.
जे स्वतःच्या बळावर नगरसेवक होऊ शकत नाहीत. त्यांना खासदारकीचे स्वप्न पडत असल्याचा टोमणा मारला. फडवणीस यांच्याविषयी माझ्या भावना अजून चांगल्या आहेत. ते मला भावासारखे आहेत. स्थानिक भाजपने मात्र माझा वापर करून घेतला, असा आरोप त्यांनी केला आहे.
तसेच संजय काकडे यांच्या भेटीनंतर अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली असून काँग्रेसचा जो कोणी उमेदवार असेल त्याला राष्ट्रवादी काँग्रेस मनापासून मदत करेल, असे अजित पवार यांनी म्हटलं आहे. काकडे भाजपवर नाराज असल्याने तुमची भेट झाली का, या प्रश्नावर काकडेंनी माझ्याशी बोलताना तसे सांगितलेले नाही. त्यामुळे ते भाजपवर नाराज असल्याची माझी माहिती नसल्याचं अजित पवार यांनी म्हटलं आहे.
COMMENTS