मध्य प्रदेश विधानसभा निवडणूक, निवडणुकीच्या तोंडावर भाजपच्या अडचणीत वाढ !

मध्य प्रदेश विधानसभा निवडणूक, निवडणुकीच्या तोंडावर भाजपच्या अडचणीत वाढ !

नवी दिल्ली – मध्य प्रदेशमध्ये सध्या विधानसभा निवडणुकीचे वारे जोरदार वाहू लागले आहेत. 28 नोव्हेंबरला ही निवडणूक पार पडणार असल्यामुळे भाजप आणि काँग्रेसमध्ये जोरदार घमासान सुरु आहे. अशातच भाजपला ऐन निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसनं जोरदार झटका दिला आहे. भाजपाचे विद्यमान आमदार संजय शर्मा आणि माजी आमदार कमलापत आर्य यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.  काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या उपस्थितीत त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

अशातच आता भाजपला आणखी एक मोठा धक्का बसणार आहे. प्रदेश काँग्रेसने आपल्या ट्विटर हँडलवर किरार समाजाचे ज्येष्ठ नेते आणि मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांचे नातेवाईक गुलाबसिंह किरार हे काँग्रेसमध्ये सहभागी होण्याबाबत जाहीर केलं आहे. त्यामुळे किरार काँग्रेसमध्ये सहभागी झाले तर या निवडणुकीत भाजपला मोठ्या अडणींचा सामना करावा लागणार आहे.

दरम्यान काही दिवसांपूर्वीच काँग्रेसनंही भाजपला धक्का दिला होता. नरसिंहपूर जिल्ह्यातील तेंदूखेडा विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजय शर्मा आणि दतिया जिल्ह्यातील भांडेरचे माजी आमदार आर्य यांनी भाजपाचा त्याग करत काँग्रेसमध्ये प्रवेश केला. विशेष म्हणजे शर्मा आणि आर्य हे भाजपात सहभागी होण्यापूर्वी काँग्रेसमध्येच होते. त्यामुळे मध्य प्रदेशात सध्या भाजप आणि काँग्रेसमध्ये फोडाफोडीचे राजकारण सुरु असल्याचं दिसत आहे.

COMMENTS