राज्यात 12 लाख 10 हजार 464 कोटींची गुंतवणूक – मुख्यमंत्री

राज्यात 12 लाख 10 हजार 464 कोटींची गुंतवणूक – मुख्यमंत्री

मुंबई –  मॅग्नेटिक महाराष्ट्र कॉर्न्व्हजन्स 2018 च्या माध्यमातून राज्यात 12 लाख 10 हजार 464 कोटी रुपये गुंतवणुकीचे 4 हजार 106 सामंजस्य करार झाले आहेत. त्या माध्यमातून 36 लाख 77 हजार 185 जणांना रोजगार उपलब्ध होणार आहे. राज्याच्या अविकसित भागात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक होणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे. मॅग्नेटिक महाराष्ट्र कॉन्व्हर्जन 2018 जागतिक गुंतवणूक परिषदेचा समारोप मंगळवारी झाला. त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. केंद्रीय रेल्वे मंत्री पियूष गोयल, राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई, कामगार मंत्री संभाजी पाटील निलंगेकर, गृह राज्यमंत्री (शहरे) डॉ. रणजित पाटील, मुख्य सचिव सुमित मल्लिक, उद्योग विभागाचे अपर मुख्य सचिव सुनील पोरवाल आदी यावेळी उपस्थित होते. यावेळी रिलायन्स उद्योग समूहाबरोबर 60 हजार कोटी रुपये गुंतवणुकीच्या तसेच राज्य शासन व भारतीय रेल्वे यांच्या समवेत सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. ‘सहभाग’ या वेबपोर्टलचे उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले.

मुख्यमंत्री श्री.फडणवीस यावेळी म्हणाले की, मॅग्नेटिक महाराष्ट्रला प्रचंड यश मिळाले आहे. राज्याच्या अविकसित भागात मोठ्या प्रमाणावर औद्योगिक गुंतवणूक झाली आहे. त्याचा फायदा मराठवाड्याला मोठ्या प्रमाणावर होणार आहे. मॅग्नेटिक महाराष्ट्रच्या यशस्वीते विषयी मुख्यमंत्री म्हणाले की, एकूण 4 हजार 106 सामंजस्य करार झाले असून त्या माध्यमातून राज्यात 12 लाख 10 हजार 464 कोटी रुपयांची गुंतवणूक होणार आहे. त्यामध्ये सर्वात जास्त गुंतवणूक उद्योग क्षेत्रात 5 लाख 48 हजार 166 कोटी एवढी होणार असून गृह निर्माण क्षेत्रात 3 लाख 85 हजार तर ऊर्जा क्षेत्रात 1 लाख 60 हजार 268 कोटी गुंतवणूक होणार आहे. शासनाच्या विविध पायाभूत प्रकल्पांचे 104 सामंजस्य करार झाले असून त्या माध्यमातून 3 लाख 90 हजार 400 कोटी रुपयांची गुंतवणूक होणार असून 2 लाख 6 हजार 266 रोजगार निर्मीती होणार आहे. राज्य शासनाने महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या माध्यमातून संरक्षण आणि हवाई उद्योगासाठी 1 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात येणार आहे.

राज्याच्या गडचिरोली, हिंगोली, नांदेड, परभणी, नंदूरबार यासारख्या औद्योगिकदृष्ट्या अविकसित भागात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक होणार आहे. नव्याने सुरू करण्यात आलेल्या ‘सहभाग’ वेबपोर्टलच्या माध्यमातून सामाजिक उत्तरदायित्व निधीचा (सीएसआर) वापर सामाजिक विकासासाठी करण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.केंद्रीय रेल्वे मंत्री म्हणाले की, महाराष्ट्राने देशाच्या विकासातमहत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. महाराष्ट्र हे देशाचे ग्रोथ इंजिन आहे. केंद्र शासनाने 2004 ते 2014 या पाच वर्षात 5 हजार 857 कोटी रुपये रेल्वे विकासासाठी महाराष्ट्रात गुंतविले होते. मात्र, त्यानंतर आतापर्यंत 24 हजार 400 कोटी रुपये महाराष्ट्रासाठी देण्यात आले आहेत. लातूरमध्ये सुरु होणारा रेल्वे कोच निर्मिती कारखाना अवघ्या एका बैठकीत मंजूर करण्यात आला. त्याचबरोबर या प्रकल्पासाठी लागणारी जमीन देखील तातडीने हस्तांतरित करण्यात आली.

COMMENTS