मुंबई – लोकसभा निवडणुकीतील जागावाटपाची काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील थांबलेली बोलणी सुरू झाली असून महाराष्ट्रातील लोकसभेच्या ४८ जागांपैकी ४० जागांचे वाटप पूर्ण झाले आहे. काल रात्री पार पडलेल्या बैठकीत जागा वाटपाबरोबरच महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराविषयही चर्चा झाली. त्यानुसार काँग्रेस, राष्ट्रवादी आणि मित्र पक्षांच्या महाआघाडीची पहिली सभा जानेवारी महिन्यात घेण्याचा निर्णय कालच्या बैठकीत घेण्यात आला. महाराष्ट्रात या सभेच्या माध्यमातून निवडणुकीच्या प्रचाराला महाआघाडी सुरुवात करणार असून काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली ही सभा होणार आहे. या सभेची तारीख आणि ठिकाण नंतर ठरवले जाणार आहे.
या सभेत आघाडीत सहभागी होणार्या मित्र पक्षांच्या नेत्यांनीही निमंत्रित केले जाणार आहे. राज्यातील आघाडीचे जागा वाटप अंतिम टप्यात असून 40 जागांची बोलणी पूर्ण झाली आहे. उर्वरित आठ जागांमध्ये पुणे, नगर, रत्नागिरी-सिंधुदुर्ग, औरंगाबाद, यवतमाळ, रावेर, जालना, नंदुरबार या जागांचा समावेश आहे. यातील काँग्रेसकडे असलेली पुणे, यवतमाळ, रत्नागिरी-सिंधुदुर्ग आणि नंदुरबार, औरंगाबाद या जागा राष्ट्रवादीला हव्या आहेत. तर राष्ट्रवादीकडे असलेली नगरची जागा काँग्रेसला विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचा मुलगा सुजय पाटील याच्यासाठी हवी आहे. मित्रपक्षांमध्ये हातकणंगलेची जागा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांच्यासाठी तर पालघरची जागा हितेंद्र ठाकूर यांच्या पक्षासाठी सोडण्यात येणार आहे. प्रकाश आंबेडकर जर आघाडीत सहभागी झाले तर अकोल्याची जागा त्यांच्यासाठी सोडायची काँग्रेसची तयारी आहे.
देशातील पाच राज्यांच्या निवडणुकीतील निकालानंतर पुन्हा एकदा राज्यातील निवडणुकीच्या तयारीला काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने वेग देण्याचे ठरवले आहे. राजस्थान छत्तीसगड आणि मध्य प्रदेश काँग्रेसने जिंकल्यामुळे राज्यातील जागा वाटपामध्ये काँग्रेस आक्रमक राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे काही जागांच्या वाटपाचा निर्णय दिल्लीत पक्षश्रेष्ठींच्या स्तरावर होण्याची शक्यता आहे.
COMMENTS