अहमदनगर – पशूसंवर्धन मंत्री आणि राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी दोन दिवसांपूर्वी पारनेर तालुक्यातील सुपा येथे शिवसेनेचे माजी तालुका प्रमुख निलेश लंके यांची भेट घेतली. या भेटीमुळे जिल्ह्यात राजकारणात विविध चर्चांना उधाण आलं आहे. शिवसेनेतून बडतर्फ केलेले निलेश लंके हे राष्ट्रीय समाज पक्षात जाणार ? तसंच ते राष्ट्रीय समाज पक्षाच्या तिकीटावर अहमदनगरमधून लढणार का ? असे प्रश्न या निमित्ताने चर्चीले जात आहेत.
पारनेर तालुक्यातील शिवसेना नेते विद्यमान आमदार विजय औटी आणि निलेश लंके या दोन गटात गेल्या अनेक दिवसांपासून वाद सुरू होता. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या कार्यक्रमातच लंके आणि औटी गटात राडा झाला होता. त्याची शिक्षा म्हणून लंके यांची शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली. लंके यांचं तालुक्यात चांगलंच प्रस्थ आहे. त्यामुळे ते विधानसभा निवडणूक लढवतील अशी शक्यता वर्तविली जात आहे. मात्र ते कोणत्या पक्षातून लढणार की अपक्ष म्हणून लढणार याबाबत विविध तर्तवितर्क लढवले जात आहेत. त्या पार्श्वभूमीवर जानकर यांनी त्यांची घेतलेली भेट महत्वाची मानली जात आहे.
COMMENTS