बीड – मराठा आरक्षणानंतर आता धनगर समाज आरक्षणासाठी आक्रमक झाला आहे. निवडणुकीदरम्यान भाजपनं आरक्षणाचं आश्वासन दिलं होतं. परंतु चार वर्ष संपली तरी भाजपनं आश्वासन पूर्ण केलं नसल्यामुळे धनगर समाजाचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. काही दिवसांपूर्वी भाजपच्या जाहीरनाम्याची राज्यात ठिकठिकाणी होळी करण्यात आली होती. तसेच आरक्षण दिलं नाही तर आगामी निवडणुकीत भाजपला मतदान न करण्याचा इशाराही धनगर समाजानं दिला आहे.
दरम्यान बीड येथील धनगर समाजाचे कार्यकर्ते विशाल पांढरे यांनी आरक्षणासंदर्भात धनगर समाजाचे नेते आणि मंत्री महादेव जानकर यांच्याशी फोनवरुन संपर्क साधला. यावेळी महादेव जानकर यांनी अगोदर पक्षाचं काम करा. पक्षाला मतदान करा, पक्षाचे आमदार, खासदार निवडून आणा मगच आरक्षण मिळू शकतं असं वक्तव्य जानकर यांनी केलं आहे. तसेच आरक्षणापेक्षा पक्षाचं काम महत्त्वाचं असल्याचंही जानकर यांनी म्हटलं आहे. तुम्ही काँग्रेस-राष्ट्रवादीला मतदान करता. ते अगोदर बंद करा राष्ट्रीय समाज पक्षाला मतदान करा असंही जानकर यांनी म्हटलं आहे. याबाबतची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. दोन दिवसांपूर्वीची ही ऑडिओ क्लिप असल्याची माहिती आहे.
COMMENTS