मुंबई : भाजपचे नेते गोपीनाथ मुंडे यांच्या पुढाकाराने विधानसभेच्या २०१४ च्या निवडणुकीपूर्वी माधव पॅटर्न नुसार भाजप-शिवसेनेच्या युतीमध्ये काही इतर पक्षांना सामावून घेत महायुती तयार करण्यात आली होती. मात्र, मुंडेंच्या पश्चात भाजप नेतृत्वाने घटक पक्षांची ताकद कमी करण्याचे रणनिती आखलेल्याने या पक्षांचे राज्यातील अस्तित्व धोक्यात आले आहे.
महायुतीचे सरकार स्थापन झाल्यानंतर धनगर समाजाचे नेते आणि रासपाचे अध्यक्ष महादेव जानकर व शेतकरी नेते सदाभाऊ खोत यांना विधानपरिषदेवर संधी दिली. मात्र, २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत जागा देण्यात आल्या नाहीत. तेव्हापासून घटक पक्ष नाराज असल्याची चर्चा होती. दरम्यान, भाजप नेत्यांकडून गोपिचंद पडळकर यांना ताकद देण्यात येत असल्याने महादेव जानकर यांनी नाराजी व्यक्त केली होती. तसेच रासपाचे आमदार रत्नाकर गुट्टे यांना ईडीची नोटीस पाठिवल्यानंतर तर जानकर आक्रमक झाले होते.
जानकरांनी आपले पारंपारिक विरोधक असलेल्या शरद पवार आणि अजित पवार यांची भेट घेतली होती. त्यानंतर त्याचा परिणाम म्हणूनही जानकरांनी भाजपपासून अंतर ठेवून राजकारण करण्यास सुरुवात केली. सध्या भाजपने वीज बिलावर आंदोलन जाहीर केले आहे. त्यावर जानकर यांनी आम्ही मात्र भाजपसोबतच्या आंदोलनात सहभागी होणार नाही. आम्ही स्वतंत्रपणे आमची आंदोलने करू, असं महादेव जानकर यांनी स्पष्ट केलं.
भाजप हा आमचा मित्र पक्ष आहे. पण आम्हालाही आमचं अस्तित्व टिकवायचं आहे. त्यांच्या प्रत्येक आंदोलनात आम्ही सहभागी होऊ शकत नाही. किती दिवस भाजपच्या पाठीवर बसून जायचं? आमचा पक्षही राष्ट्रीय पक्ष आहे. आमचा पक्ष वाढला तर कार्यकर्त्यांनाही ताकद मिळेल, असं जानकर म्हणाले. भाजप वीज बिलासंदर्भात आंदोलन करत असेल तर आमचा त्याला पाठिंबाच राहील. पण त्यांच्या आंदोलनात आम्ही सहभागी होणार नाही, असंही त्यांनी सांगितलं.
COMMENTS