मुंबई – दुग्धविकास मंत्री आणि रासपचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरला आहे. यावेळी जानकर यांनी भाजपमधून उमेदवारी अर्ज न भरता आपल्या रासप या पक्षातून हा अर्ज भरला आहे. परंतु जानकर यांनी भाजपाचे उमेदवार म्हणून निवडणूक लढवावी असं भाजपचं म्हणणं आहे. तर महादेव जानकर रासपकडून विधानपरिषद निवडणूक लढवण्यावर ठाम असल्याची माहिती आहे.
दरम्यान भाजपाने पाठिंबा दिला नाही तर जानकर आपला उमेदवारी अर्ज मागे घेणार असल्याची शक्यताही वर्तवली जात आहे. तसेच यापूर्वी जाणकार हे भाजपचे विधानपरिषद सदस्य होते. त्यामुळे पक्षांतर बंदी कायद्याची अडचण नको म्हणून जानकार यांनी आमदारकीचा राजीनामा देऊन रासपकडून उमेदवारी अर्ज भरला आहे. मात्र भाजपने अद्यापही त्यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे जानकर आपला उमेदवारी अर्ज मागे घेणार का याकडे लक्ष लागलं आहे.
चंद्रकांत पाटील यांची प्रतिक्रिया
11 विधानपरिषदच्या जागेसाठी महादेव जानकर हे निवडणूक लढवत आहेत. ते आधी भाजपाच्या चिन्हावर परिषदेवर निवडून आले होते. मात्र काल विधानपरिषदचा निवडणुकीसाठी अर्ज भरतांना त्यांच्या राष्ट्रीय समाज पक्षाच्या चिन्हावर अर्ज भरला. तेव्हा त्यांनी दुसऱ्या पक्षाद्वारे निवडणूक लढवली असा तांत्रिक मुद्दा निघत पक्षांतरबंदी कायद्याअंतर्गत निवडणूक लढवण्यास 6 वर्षांची बंदी येऊ शकते. म्हणून हा तांत्रिक मुद्दा लक्षात घेता त्यांनी काल अर्ज भरण्यापूर्वी सदस्यत्व पदाचा राजीनामा दिला. तसंच जानकर हे त्यांच्या पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढवत असल्याने केंद्रीय नेतृत्व त्यांच्याबाबत निर्णय घेईल.तसेच भाजपाच्या 6 उमेदवारांमध्ये कोण अर्ज मागे घेणार याबद्दल केंद्रीय संसदीय समिती निर्णय घेणार असून विधानपरिषद निवडणूक मात्र बिनविरोध होईल हे निश्चित.
COMMENTS