मुंबई – आगामी विधानसभा निवडणुकीच्या मैदानात उतरण्याची घोषणा आणखी एका पक्षानं केली आहे. दिल्लीत सत्तेत असणाय्रा अरविंद केडरीवाल यांच्या आम आदमी पार्टी महाराष्ट्र विधानसभा निवडणूक लढवणार आहे. यासाठी आपचे राज्य प्रभारी दुर्गेश पाठक यांनी महाराष्ट्राची निवडणूक प्रचार समिती जाहीर केली आहे. शेतकरी नेते रंगा राचुरे हे या समितीचे अध्यक्ष असतील तर युनोमधील माजी अधिकारी किशोर मंध्यान उपाध्यक्ष म्हणून काम पाहणार आहेत.
मागील विधानसभा निवडणुकीत जनतेने सत्तापालट केल्यानंतर आताचे सत्ताधारी भाजप -शिवसेना ही युती राजकीय , सामाजिक, आर्थिक आणि प्रशासकीय आघाडीवरही अपयशी ठरली असल्याचं आप नेत्यांनी म्हटलं आहे. एकेकाळी पुढारलेले राज्य म्हणून ख्याती असलेला महाराष्ट्र आज दुष्काळ,पूर, शेतकरी आत्महत्या,बेरोजगारी,शिक्षण क्षेत्रातील अनागोंदी,ढासळलेली कायदाव्यवस्था अशा अनेक प्रश्नांनी बेजार झाला आहे. महाराष्ट्र सरकार कुठल्याच बाबतीत ठोस निर्णय घेताना दिसत नाही आणि दुसरीकडे विरोधी पक्ष आत्मविश्वासच गमावून बसला आहे. सत्ताधाय्रांना कोंडीत पकडण्याऐवजी विरोधी पक्ष स्वतःच गोंधळलेल्या स्थितीत असल्याचंही आप नेत्यांनी म्हटलं आहे.
आज महाराष्ट्राच्या समोर असलेल्या अनेक प्रश्नांना उत्तरे दिल्लीतील केजरीवाल सरकारच्या आप मॉडेलमध्ये आहेत. लोककल्याणकारी धोरण आणि उत्तम अंमलबजावणीमुळे शिक्षण, आरोग्य क्षेत्रातील काम जागतिक पातळीवर प्रशंसनीय ठरले आहे. प्रस्थापित राजकारणाला एक नवे वळण देण्याचे काम दिल्लीत आप सरकारने केले आहे. तोच संकल्प घेऊन आम्ही राज्यात जास्तीत जास्त जागांवर निवडणुका लढवण्याचा निश्चय केला आहे. भावनात्मक मुद्द्यापालिकडे जाऊन विकासाचे राजकारण करण्यासाठी आम्ही निवडणूक लढवणार आहोत असंही आपचे राज्य प्रभारी दुर्गेश पाठक यांनी म्हटलं आहे.
आपची महाराष्ट्र प्रचार समिती
1.शेतकरी नेते रंगा राचुरे – संयोजक
2.युनो तील माजी अधिकारी किशोर मंद्यान – सह संयोजक
3.धनंजय शिंदे – सचिव
4.जगजीत सिंग – खजिनदार
5.आप राष्ट्रीय कार्यकारी समिती च्या प्रिती शर्मा मेनन
6.देवेंद्र वानखेडे – सदस्य
7.कुसुमाकर कौशिक – सदस्य
8.अजिंक्य शिंदे – सदस्य
9.डॉ. सुनिल गावित – सदस्य
10.मुकुंद किर्दत – सदस्य
11.संदीप देसाई – सदस्य
COMMENTS