मुंबई – आरक्षणाच्या मागणीवरुन मराठा समाजानं आक्रमक भूमिका घेतली असून आज महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी सकल मराठा मोर्चाच्या वतीने बंदची हाक देण्यात आली आहे. या बंदमधून मुंबई, पुणे, सातारा, सोलापूरला वगळण्यात आले असल्याची माहिती आहे. आंदोलनात सोमवारी काकासाहेब शिंदे (वय २८) या तरुणाने गंगापूर तालुक्यातील कायगाव टोक येथे पुलावरील गोदावरी नदीच्या पात्रात उडी मारली. यात काकासाहेब शिंदे याचा मृत्यू झाला. त्याच्या मृत्यूनंतर राज्यभरात मराठा बांधवांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे.
दरम्यान काकासाहेब शिंदेच्या मृत्यूच्या पार्श्वभूमीवर मराठा संघटनांनी आज महाराष्ट्र बंदची हाक दिली असून खबरदारी म्हणून मराठवाड्यातील शाळा आणि महाविद्यालये बंद ठेवण्यात आली आहेत. तसेच पंढरपूरमधून परतत असलेल्या वारकऱ्यांची गैरसोय होऊ नये यासाठी सातारा, सोलापूर, पुणे आणि मुंबई या शहरांना बंदमधून वगळण्यात आले असल्याची माहिती आहे. तसेच आंदोलकांनी बसेसवर दगडफेक करू नये, अशा सूचना समन्वयकांनी दिल्या आहेत.
COMMENTS