महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदी ‘या’ नेत्याची वर्णी ?

महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदी ‘या’ नेत्याची वर्णी ?

मुंबई – अशोक चव्हाण यांच्या राजीनाम्यानंतर महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदी कोणाची वर्णी लागणार याबाबत तर्कवितर्क लावले जात होते. परंतु महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदी बाळासाहेब थोरात यांची वर्णी लागल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र काँग्रेसमध्ये मोठे नेतृत्व बदल केले जात आहेत. प्रदेशाध्यक्ष पदासोबत चार कार्याध्यक्ष नेमले जाणार असून नितीन राऊत, यशोमती ठाकूर, विश्वजीत कदम, बसवराज पाटील कार्याध्यक्ष असणार आहेत. त्याचीही नियुक्ती लवकरच केली जाणार असल्याची माहिती आहे.

दरम्यान लोकसभा निवडणुकीनंतर राज्यात काँग्रेसला मोठे धक्के बसत आहेत. अनेक मोठे नेते, आमदार शिवसेना-भाजपच्या वाटेवर आहेत. त्यामुळे राज्यात पक्षनेतृत्व बदल करत राज्यात काँग्रेसने नव्याने पक्ष बांधणी सुरु केली आहे. याआधीच, काँग्रेसच्या विधीमंडळ नेतेपदी थोरातांची वर्णी लागली आहे. आता प्रदेशाध्यक्षपदाच्या रुपाने थोरातांच्या खांद्यावर आणखी एक जबाबदारी पडली आहे.

बाळासाहेब थोरात 2009 मध्ये अहमदनगरमधील संगमनेर मतदारसंघातून आमदारपदी निवडून आले होते. राज्यात त्यांनी कृषी आणि महसूल मंत्रिपदाची धुरा सांभाळली होती. थोरातांनी संगमनेरमध्ये अनेक सहकारी शिक्षणसंस्था स्थापन केल्या आहेत. दूध सहकार चळवळीचे ते अग्रणी नेते मानले जातात. अहमदनगरमध्ये विखेंचे प्रतिस्पर्धी म्हणून थोरातांची ओळख राज्यभरात आहे.

COMMENTS