मुंबई – राज्यातल्या सर्व 48 मतदारसंघातील मतदान झाले आहे. सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. त्या 23 मे या तारखेकडे. कारण त्या दिवशी लोकसभेची मतमोजणी होणार आहे. प्रत्येकजण आपआपल्या पद्धतीने कोण जिंकून येईल याचा अंदाज बांधत आहे. साधारणपणे राज्यात 11 मतदारसंघाच्या निकालाचे अंदाज बांधताना फारशी अडचण येत नाही. कारण या मतदारसंघाच्या निकालाबाबत फारसे मतभेद दिसून येत नाहीत. अकोला, जालना, परभणी, बारामती, पुणे, सातारा, कोल्हापूर, रत्नागिरी सिंधुदुर्ग, रावेर, कल्याण, दक्षिण मुंबई या मतदारसंघाच्या अंदाजाबाबत फारसे वाद होताना दिसत नाहीत.
संपूर्ण विदर्भातून फक्त अकोल्याच्या निकालाबाबत स्थानिक निश्चितपणे विजयी उमेदवार सांगत आहेत. भाजपाचे संजय धोत्रे विजयी होतील असा अंदाज आहेत. अगदी नितीन गडकरी यांच्या मतदारसंघातीलही अंदाज छातीठोकपणे सांगितला जात नाही. त्यानंतर मराठवाड्यात जालना लोकसभा मतदारसंघ सोडल्यास कोणत्याही मतदारसंघातील निकालाबाबत संभ्रमावस्था आहे. जालन्यातून भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे विजयी होतील असा अंदाज आहे. परभणीतून राष्ट्रवादी काँग्रेसचे राजेश विटेकर विजयी होतील या अंदाजाबाबत ब-यापैकी एकमत आहे.
दुसरीकडे पश्चिम महाराष्ट्रातील बारामती, पुणे, सातारा, कोल्हापूर या चार मतदारसंघाच्या निकालाबाबतही ब-यापैकी अंदाज बांधले जात आहेत. बारामतीमधून सुप्रिया सुळे विजयी होतील असा अंदाज आहे. अर्थात भाजपचे नेते आम्हीच जिंकणार असा दावा ठोकतायेत. पुण्यातून भाजपचे गिरीष बापट जिंकतील याबाबत फारसे मतभेद नाहीत. साता-यातून उदनराजे भोसले हे जिंकतील पण त्यांचे मताधिक्य कमालीचे घटेल असं बोललं जातंय. तर कोल्हापुरातून शिवसनेचे संजय मंडलिक जिंकतील असा अंदाज आहे.
उत्तर महाराष्ट्रातील केवळ रावेर लोकसभा मतदारसंघाचा अंदाज ठामपणे वर्तविला जात आहे. रावेरमधून भाजपाच्या रक्षा खडसे जिंकतील अशी शक्यता आहे. कोकणात रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघातून शिवसेनेचे विनायक राऊत विजयी होतील असा अंदाज आहे.तर ठाणे जिल्ह्यातील कल्याण लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचे डॉ. श्रीकांत शिदे जिंकतील अशी शक्यता आहे. तर मुंबईतील केवळ मुंबई दक्षिण लोकसभा मतदारसंघातून मिलिंद देवरा जिंकतील अशी शक्यता आहे. इतर जागांबाबत अनेकजण अंदाज सांगत असले तरी त्या अंदाजाबाबत फारसे मतैक्य होत नसल्याचं दिसून येतंय.
COMMENTS