महाविकास आघाडी सरकारचा आणखी एक मोठा निर्णय, ‘या’ महामंडळावरील अध्यक्ष, संचालकांच्या नियुक्त्या रद्द !

महाविकास आघाडी सरकारचा आणखी एक मोठा निर्णय, ‘या’ महामंडळावरील अध्यक्ष, संचालकांच्या नियुक्त्या रद्द !

मुंबई – राज्याच्या सामाजिक न्याय विभागांतर्गत येणाऱ्या महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ, संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळ, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळ, यांसह जादूटोणा विरोधी कायदा अंमलबजावणी समिती, व्यसनमुक्ती समिती आदींच्या अध्यक्ष, संचालकांच्या नियुक्त्या रद्द करण्यात आल्या आहेत. यासंबंधीचा शासन निर्णय जारी करण्यात आला असून महाविकास आघाडी सरकार या सर्व महामंडळ/ समित्यांच्या अध्यक्ष, संचालकांच्या नव्याने नियुक्त्या करणार असल्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या कार्यालयाकडून सांगण्यात आले आहे.

या शासन निर्णयाद्वारे महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाचे अध्यक्ष राजा सरवदे, संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळाचे अध्यक्ष अशोक विजयकर यांच्यासह मुंबई, नागपूर विभागासह सर्व संचालकांच्या नियुक्त्याही रद्द करण्यात आल्या आहेत. तसेच साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाचे अध्यक्ष अमित गोरखे यांचीही नियुक्ती याद्वारे रद्द करण्यात आली आहे.

या सर्व नियुक्त्या रद्द करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती, लवकरच विभागामार्फत नव्याने या नियुक्त्या करण्यात येतील असेही विभागामार्फत कळवण्यात आले आहे.

जादूटोणा विरोधी, व्यसनमुक्ती, दिव्यांग हक्क समित्याही रद्द…

सामाजिक न्याय विभागांतर्गत येणाऱ्या जादूटोणा विरोधी अंमलबजावणी, प्रचार व प्रसार समिती, राज्यस्तरीय व्यसनमुक्ती समिती, दिव्यांग व्यक्ती हक्क सल्लागार मंडळ, या सर्व समित्याचे अध्यक्ष, सदस्य या सर्व नियुक्त्याही स्वतंत्र शासन निर्णयाद्वारे रद्द करण्यात आल्या असल्याचे विभागामार्फत कळवण्यात आले आहे.

पूर्वी नियुक्त केलेल्या या सर्व महामंडळे व समित्यांच्या नेमणुका रद्द करण्यात आल्या असून, विभागाच्या योजना व जबाबदाऱ्यांची चोख व प्रभावी अंमलबजावणी व्हावी यासाठी या सर्व पदी नव्या नेमणूका करण्यात येणार असल्याचे राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या कार्यालयातर्फे म्हटले आहे.

COMMENTS